

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेल्या 105 जणांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी बारामती हॉस्टेल येथे पार पडल्या. त्यामुळे महापालिकेप्रमाणेच दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी अजित पवार यांनी इच्छुकांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढावी लागणार असल्याचे संकेत दिले.
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना मोठा पराभावला सामोरे जावे लागले. त्यामुळे आत्मचिंतनासाठी दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती येथे गेले. तेथे बंद दाराआड झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या...
या भेटीनंतर रविवारी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती थेट अजित पवार यांनी घेतल्या. या घडामोडीमुळे या निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष विजय कोलते, अप्पासाहेब पवार, सुदाम इंगळे आदी उपस्थित होते.
आजी-माजी आमदारांच्याही अजित पवारांसोबत भेटी
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी या निवडणुकीच्या संदर्भात बंद दाराआड चर्चा केली. यावेळी भोर, पुरंदर, दौंड येथील काही इच्छुकांनी पवार यांची भेट घेतली. तसेच आमदार शंकर मांडेकर, सुनील शेळके, शिवाजीराव आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील यांनीही पवार यांची भेट घेतली.