

धुळे ६०३ टक्के, पुणे ५७० टक्के अधिक
मराठवाड्यात ४ टक्के जास्त
कोकण, विदर्भात मात्र उष्ण झळा, अत्यल्प पावसाची नोंद
पुणे ,पुढारी वृत्तसेवा : राज्यात एप्रिलमध्ये यंदा अवकाळीचा जबरदस्त जोर असून, सर्वाधिक पाऊस मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात मिळून सरासरीच्या ७७ टक्के जास्त झाला आहे. त्या पाठोपाठ मराठवाड्यात ४ टक्के जास्त झाला आहे. कोकण, विदर्भात मात्र अत्यल्प अवकाळी पाऊस झाला असून, तेथे उष्णतेच्या जोरदार लाटा सुरूच आहेत. उन्हे आणि पाऊस असे मिश्र वातावरण यंदा मे अखेरपर्यंत राहणार आहे. कारण, सध्या पावसाला पूरक असणारी ला-निना स्थिती सुरू आहे.
राज्यात यंदा उन्हाचा जोरदार कडाका जाणवत आहे. त्या सोबतच मध्य, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात जोरदार पाऊस झाला असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्याची एप्रिलची सरासरी अवघी १०.७ मि.मी. आहे. प्रत्यक्षात ९.७ मि.मी. इतका पाऊस १ ते २३ एप्रिलदरम्यान पडला आहे. विदर्भ आणि कोकणात कमी पाऊस झाल्याने राज्याची एप्रिलची सरासरी उणे ९ इतकी भरली आहे. मात्र, मध्य व उत्तर महाराष्ट्र मिळून सरासरी ७७ टक्के आहे. तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
महाराष्ट्र (एकूण) : उणे ९ टक्के (कमी)
(सरासरी : १०.७ मि.मी. पडला ९.७ मि.मी.)
मध्य व उत्तर महाराष्ट्र : ७७.९ टक्के (जास्त)
सरासरी : ७.६ मि.मी., पडला : १३.५ मि.मी.)
मराठवाडा : ४ टक्के (जास्त)
(सरासरी : ११.३ मि.मी., पडला : ११.७ मि.मी.)
विदर्भ : उणे ५९.९ टक्के (खूप कमी)
(सरासरी : १६.३ मि.मी., पडला : ६.७ मि.मी.)
कोकण : उणे ८० टक्के (खूप कमी)
(सरासरी : ३.६ मि.मी., पडला : ०.७ मि.मी.)
धुळे (६०३) , पुणे (५७०), नाशिक (२२१) , जळगाव (१०६) छत्रपती संभाजीनगर (१५४), हिंगोली (७४), जालना (४६).