

पुणे : राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे यंदा 24 मे 2026 रोजी 47.6 अंश इतके होते. हा तापमानाचा उच्चांक सुमारे 114 वर्षांनी दुसऱ्यांदा नोंदविला गेला.
राज्यात पुढील पाच दिवस विदर्भासह काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्णतेमुळे रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या शंभर वर्षांतील 36 जिल्ह्यांच्या तापमानाचा ताळेबंद तपासला असता असे लक्षात येते की, मार्च ते मे या तीन महिन्यांत मे महिना आजवर सर्वांत उष्ण ठरला आहे. विदर्भाचा पारा उन्हाळ्यात दवर्षी 45 अंशांवर जातो. तेथे मे महिन्यात हे तापमान सामान्य समजले जाते.
राज्याचा पारा फक्त एकदा 48 अंशांवर गेला आहे. यंदा सलग आठ दिवसांपासून ब्रह्मपुरी, वर्धा, अमरावती, अकोला या शहरांचे तापमान सतत 46 ते 47 अंशांवर जात आहे. 24 मे 2026 रोजी ब्रह्मपुरीचा पारा 47.6 अंशांवर गेल्याने गत 114 वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान नोंदले गेले.
राज्यात कमाल तापमान
रेकॉर्ड (अंश सेल्सिअस)
16 मे 1912 : चंद्रपूर : 48.3
(आजवरचे विक्रमी)
24 मे 2026 ः ब्रह्मपुरी : 47.6
(दुसऱ्या क्रमांकाचे)
27 मे 2024 ः ब्रह्मपुरी ः 47.1