

पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे गाळप हंगाम २०२४-२५ आणि २०२५-२६ साठी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षमता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. दोन्ही वर्षांतील एकूण ५७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले आहेत. राज्याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्लीत २२ सप्टेंबरला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध राज्यांतील संबंधित मंत्री, साखर कारखान्यांचे संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सहकारी साखर उद्योगातील गुणवत्ता, कार्यक्षमता, आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक व्यवस्थापन व सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देण्यासाठी महासंघातर्फे दरवर्षी पुरस्कार दिले जातात.
तांत्रिक कार्यक्षमतेच्या उच्च उतारा विभागात नीरा भीमा सहकारी साखर कारखाना पुणे प्रथम, विलास सहकारी साखर कारखाना तुळजापूर द्वितीय व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना पुणे तृतीय. सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार साताऱ्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला मिळाला. संस्थात्मक सामाजिक दायित्व विभागात सांगलीच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची निवड झाली. सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, सोलापूर. वसंतदादा पाटील पुरस्कार २०२५-२६ डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, सांगलीला मिळाला.
उच्च उतारा विभाग : कोल्हापूरचा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रथम, जालन्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना द्वितीय, तर साताऱ्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला तृतीय पुरस्कार
तांत्रिक कार्यक्षमता : साताऱ्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रथम, सांगलीतील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना द्वितीय, तर पुण्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तृतीय ठरला.
आर्थिक व्यवस्थापन : सोलापूरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना तृतीय
सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार : कोल्हापूरचा भोगावती सहकारी साखर कारखान्याला
संस्थात्मक सामाजिक दायित्व पुरस्कार : कोल्हापूरचा अशोक सहकारी साखर कारखाना
सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना : श्री छत्रपती शाहू सहकारी कारखाना, कागल, कोल्हापूर
वसंतदादा पाटील पुरस्कार : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे
जीवनगौरव पुरस्कार : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर