60 High-Tech Document Registration Offices | राज्यात लवकरच ६० हायटेक दस्तनोंदणी कार्यालये

खासगी संस्थांचा सहभाग; पहिले कार्यालय पुण्यात ऑगस्टमध्ये
60 High-Tech Document Registration Offices |
60 High-Tech Document Registration Offices | राज्यात लवकरच ६० हायटेक दस्तनोंदणी कार्यालये
Published on
Updated on

पुणे : नागरिकांना अत्याधुनिक आणि आरामदायक वातावरणात दस्तनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने खासगी संस्थांच्या सहभागातून राज्यात तब्बल ६० हायटेक दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले कार्यालय पुण्यातील कोथरूड येथे ऑगस्टमध्ये सुरू होईल. दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी, अपुर्‍या सुविधा आणि वेळेचा होणारा अपव्यय यामुळे आता हे चित्र बदलणार आहे.

कोथरूडमध्ये प्रस्तावित प्रथम मॉडेल सहदुय्यम निबंधक कार्यालयाची नुकतीच पाहणी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केली. त्यावेळी खारगे यांनी आवश्यक त्या सूचना नोंदणी विभागाला केल्या. हायटेक असे पहिले मॉडेल सहदुय्यम निबंधक कार्यालय येथे सुरू करण्याबाबतचे काही परवानगीचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असून, पुढील आठ ते दहा दिवसांत यास मान्यता मिळेल, असा विश्वास नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय

पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई शहरांत ३० कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात आगामी दोन वर्षांत प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक अशी ३० कार्यालये सुरू करणार आहेत. त्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. पासपोर्ट कार्यालयात ज्या पद्धतीने सुविधा दिल्या जातात, त्याच धर्तीवर हा प्रयोग करण्यात येणार असून, याची सुरुवात पुण्यातून होणार आहे.

प्रक्रिया जलद, सोयीस्‍कर होईल

या कार्यालयात नोंदणीसाठी दुय्यम निबंधक व कारकून नेमणार, त्यांचे वेतन सरकार देणार आहे. अन्य आवश्यक कर्मचारी उदा., कार्यालयीन व्यवस्थापन, सुविधा पुरवणारे हे संबंधित खासगी संस्था नेमतील. या उपक्रमामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होईल, असा विश्वास नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने व्यक्त केला आहे.

सुविधांसाठी शुल्‍क

या खासगी कार्यालयांत दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सोफासेट, वातानुकूलित कार्यालय, स्वच्छ स्वच्छतागृहाची सोय आणि नोंदणीला वेळ लागणार असल्यास चहा-कॉफीचीही व्यवस्था असेल. मात्र, या सर्व सोयीसुविधांसाठी दस्त नोंदणी करणार्‍या नागरिकांना अतिरिक्त सेवा शुल्क भरावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news