

पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रतेसाठी बंधनकारक असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ 21 जूनला घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 27 मार्च ते 16 एप्रिलदरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तसेच, परीक्षा अर्ज केवळ इंग्रजी भाषेतच भरावे लागणार आहेत, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. उमेदवार 27 मार्च ते 16 एप्रिल या कालावधीत अर्ज भरू शकतील. उमेदवारांना 9 जून ते 21 जून या कालावधीत प्रवेश अर्जाची प्रिंटआऊट उपलब्ध होईल. टीईटी पेपर क्रमांक एक 21 जून रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होईल, तर पेपर क्रमांक दोन दुपारी अडीच ते पाच या वेळेत घेतला जाईल. परीक्षाविषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पेपर (प्राथमिक स्तर) व पेपर (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरांसाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा; जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल, असेदेखील स्पष्ट केले आहे.