

पुणे : राज्यातील प्राथमिक शिक्षणव्यवस्थेत केंद्रप्रमुख या पदाची पुनर्रचना करण्यात आली असून, या पदास आता ’समूह साधन केंद्र समन्वयक’ असे संबोधले जाणार आहे. शासनाने निर्णय जाहीर करीत या पदभरतीसंबंधी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. केंद्र समन्वयकांच्या 4 हजार 860 पदांची लवकरच भरती केली जाणार असून, 50 टक्के पदोन्नती, 50 टक्के स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदभरती करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
शासन निर्णयानुसार केवळ पदनामात बदल करण्यात आला असून, केंद्रप्रमुख पदासाठी लागू असलेली अर्हता आणि नेमणुकीची पद्धत जशीच्या तशी कायम राहणार आहे. संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी समान वाटप होईल. जर पदसंख्या विषम असेल, तर जादा एक पद पदोन्नती कोट्यात दिले जाईल. या परीक्षेसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) पात्र ठरतील. उमेदवारांनी त्यांच्या पदावर किमान 6 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. ही परीक्षा पदोन्नती स्वरूपाची असल्याने सामाजिक आरक्षण लागू होणार नाही. मात्र, दिव्यांग आरक्षणाची तरतूद यामध्येही राहील. सन 2023 मध्ये या पदासाठी परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्या वेळी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यांच्या माहितीमध्ये सुधारणा करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.