Engineering Admission : अभियांत्रिकीसाठी इच्छुक तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात!

इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या जागा अडवल्याचा आरोप, वंचित विद्यार्थ्यांसाठी पाचवी प्रवेश फेरी घेण्याची मागणी
Engineering Admission
Engineering AdmissionPudhari Photo
Published on
Updated on

वैभव धाडवे पाटील

सारोळा : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) आणि केंद्रीभूत सामायिक प्रवेश परीक्षा विभाग (सीईटी सेल) यांच्या प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे राज्यातील सुमारे २२ हजार विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका असून, वंचित विद्यार्थ्यांसाठी तातडीने पाचवी प्रवेश फेरी घेऊन रिक्त जागांवर प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत बीसीएस, बीसीए, बी.एससी., मेडिकल यासह अन्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश निश्चित केलेल्या काही विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याचा प्रत्यक्ष इरादा नसतानाही अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरले. त्यानंतर विविध महाविद्यालयांमध्ये त्यांना जागा अलॉट झाल्यानंतर त्यांनी प्रवेश न घेता 'बेटरमेंट'साठी त्या जागा राखून ठेवल्या. प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या आणि अंतिम फेरीपर्यंत या जागा अडून राहिल्याने प्रत्यक्ष अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसल्याचा आरोप आहे.

Engineering Admission
Engineering Direct Second Year Admission: डिप्लोमाधारकांना इंजिनिअरिंगच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची कोंडी; ९० टक्के गुण असूनही नामांकित कॉलेजचे दरवाजे बंद!

अनेक वंचित विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी प्रवेशासाठीचे पसेंटाईल संबंधित विद्यार्थ्यांपेक्षा केवळ एक ते दोन टक्क्यांनी कमी असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र, प्रवेशाच्या विविध फेऱ्यांमध्ये जागा अडवून ठेवल्यामुळे पात्र असूनही या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील या पद्धतीचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे.

संस्था स्तरावरील प्रवेश हाच पर्याय; मात्र फीचा मोठा भार

अभियांत्रिकीच्या नियमित प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर वंचित विद्यार्थ्यांसमोर आता संस्था स्तरावरील प्रवेशाचा पर्याय उरतो; मात्र, या माध्यमातून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नसल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हा मोठा आर्थिक प्रश्न निर्माण होणार आहे. संपूर्ण महाविद्यालयीन फी भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी संस्था स्तरावरील प्रवेश घेऊ शकणार नाहीत. परिणामी, अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची क्षमता आणि इच्छा असूनही केवळ प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वंचित विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी घ्या

या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी प्रवेशाची पाचवी फेरी विशेषतः वंचित विद्यार्थ्यांसाठी खुली करावी, अशी मागणी होत आहे. ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अद्याप जागा रिक्त आहेत, त्या जागांवर वंचित विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात यावा. तसेच, या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी आहे.

एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी मी पहिल्या फेरीपासून ऑप्शन भरले. मात्र, चौथ्या आणि अंतिम फेरीपर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घ्यायचा नसलेल्या विद्यार्थ्यांनी जागा अडवून ठेवल्याचा फटका मला बसला असून, त्यामुळे माझे शैक्षणिक नुकसान झाले आहे. प्रवेश धोरणात सुधारणा करून माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी.

- वैभवी नितीन गरुड, विद्यार्थी प्रतिनिधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news