पुणे : राज्यातील बहुतांश भागात जून महिना पूर्ण आणि जुलै महिन्याच्या पूर्वाधात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील धरणांचा पाणीसाठा 63.54 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान मागील दहा दिवसांपूर्वी हाच पाणीसाठा 60 टक्के होता. दहा दिवसांत सुमारे तीन ते चार टक्क्यांहून अधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान मागील वर्षी याच दिवसात 41.33 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 22.21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Pune News Update)
राज्यात मे महिन्यात सर्वदूर सातत्याने पावसाने मुसळधार ते अतिमुसळधार तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार हजेरी लावली. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यात देखील पावसाची बँटिंग जोरात सुरू होती. या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. परिणामी सध्या सर्वच भागातील धरणांचा एकूण पाणीसाठा सध्या 63.54 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान जुलैच्या दुस-या आठवड्यात पावसने जोरदार हजेरी लावली असती तर हाच पाणीसाठा 75 टक्क्यांपर्यत गेला असता, अशी माहिती जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली. दरम्यान या पाणीसाठ्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता थोड्याफार प्रमाणात मिटली आहे. तसेच कोकण, पुणे,नाशिक,नागपूर या भागातील धरणे इतर विभागातील तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक भरली. तर संभाजीनगर, अमरावती या विभागातील धरणांचा पाणीसाठा कमी असल्याचे दिसून आले.