

पुणे : ई-वाहन विक्रीत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावून 2 कोटी 41 लाख वाहनांची विक्री केली अन् यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला. पुणे शहराने मुंबईला मागे टाकत या वाहन विक्रीत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्र फक्त संशोधन आणि ईव्ही वाहन विक्रीत पुढे असून, उत्पादन कारखान्यांच्या विस्तारात हैदराबाद, दिल्ली आणि बंगळूर या शहरांच्या तुलनेत मागे आहे.
भारतात इलेक्ट्रिक वाहन युगाने किंचित गती घेतली ती 2006 पासून; मात्र त्यात अधिक प्रगती 2020 पर्यंत नव्हती. त्यानंतर कोरोनाची लाट आली आणि ई-वाहन विक्रीवर वेगाने संशोधन झाले. 2021 नंतर मात्र ई-वाहन विक्रीने मागे वळून पाहिले नाही. सध्या सर्वच राज्यांत ई-वाहनांची विक्रमी विक्री होत असून, यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. तसेच, आता इलेक्ट्रिक विमानदेखील तयार होत आहे. त्यामुळे आगामी काळात वाहनांपेक्षा हवेतला प्रवास स्वस्त होईल, अशीही चर्चा सुरू आहे. ई-वाहन विक्रीत आजवर उत्तर प्रदेश आघाडीवर होते.
पुणे हे विक्री होणारे ईव्ही शहर बनले आहे. त्यापाठोपाठ बंगळूर, सुरत, जयपूर या शहरांचा क्रमांक लागतो. संपूर्ण भारतात, टियर-1 मेट्रो ईव्ही वाढीला मोठा हातभार लावत आहेत. कर्नाटकात बंगळूर आघाडीवर आहे. राज्याच्या ईव्हीच्या 55 टक्के; (भारताच्या एकूण 5 टक्के) गुजरातमधील सुरत (25 टक्के) आणि अहमदाबाद (21 टक्के) त्यांच्या राज्यातील ईव्हीच्या वाट्याचे वर्चस्व आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक ईव्ही कार (37 हजार 343) आहेत.
भारतात ई-वाहनांचे उत्पादन औपचारिकरीत्या 2011 मध्ये सुरू झाले. 2011 मध्ये, भारत सरकारने इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘फेम’ योजना (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक अँड हायब्रीड व्हेईकल) सुरू केली. या योजनेचा उद्देश इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचा वापर वाढवणे आणि देशात या वाहनांचे उत्पादन वाढवणे हा होता. त्यानंतर, सरकारने 2015 मध्ये ‘फेम-1’ योजना सुरू केली आणि 2019 मध्ये ‘फेम-2’ योजना सुरू केली, यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला गती मिळाली.
भारतात, इलेक्ट्रिक वाहनांचा इतिहास ताजा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यात खूप वाढ झाली. 1996 मध्ये, ‘विक्रम सफा’ नावाचे पहिले तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने बनवले. त्यानंतर, 2000 मध्ये, ‘भेल’ने 18 आसनी इलेक्ट्रिक बस तयार केली; पण ई-वाहनांची खरी वाढ 2000 सालानंतर दिसली. जेव्हा ‘रेवा’सारखी इलेक्ट्रिक कार बाजारात आली. त्यानंतर, महिंद्राने ‘रेवा’ विकत घेतली आणि ‘ई-20’ नावाने इलेक्ट्रिक कार लाँच केली.
जगात पहिली इलेक्ट्रिक कार 1880 च्या दशकात बनली; पण ती फारशी यशस्वी झाली नाही; कारण बॅटरीची क्षमता आणि चार्जिंगची सोय मर्यादित होती. तर, भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला 1990 च्या दशकात सुरू झाला. 1993 मध्ये ‘लव्हबर्ड’ नावाची पहिली इलेक्ट्रिक कार आली होती; मात्र ती फार चालली नाही.
मुंबईत पहिले स्टोअर उघडून ‘टेस्ला’ने भारतात नुकताच प्रवेश केला आहे. तर, मर्सिडिज इलेक्ट्रिक कारचे उत्पादन पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमध्ये करण्यास उत्सुक असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच पुण्यातील एका कार्यक्रमात केली. त्यामुळे ईव्ही कार उत्पादकांचे भारताच्या बाजारपेठेकडे लक्ष आहे.