वैभव धाडवे पाटील
भोर मतदारसंघात या वेळी चुरशीची लढत होणार असून प्रस्थापित आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात सगळे विरोधक एकत्र येऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. ‘मी लढणारच..’ असे म्हणणार्या संभाव्य उमेदवारांचा घोडेबाजार झाल्यास कोण थांबतंय आणि त्यांची निवडणुकीतील भूमिका कशी असणार यावरच निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. या घोडेबाजाराकडे मतदारांचे लक्ष आहे.
अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनाच मिळणार आहे, हे जाहीर झाल्यासारखेच असताना शिवसेना (उबाठा) गटाचे शंकरराव मांडेकर यांची जोरदार तयारी चालू आहे. ‘मी लढणारच...’ असे म्हणणार्या मांडेकर यांनी अपक्षही लढण्याचा निर्धार केल्याची चर्चा आहे.
महायुतीमध्ये जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळणार, कारण मागील दोन वेळा शिवसेनेचे कुलदिप कोंडे अल्पशा मतांनी पराभूत झाले आहेत. सध्या शिवसेना (शिंदे गट) उमेदवारीसाठी कुलदिप कोंडे व बाळासाहेब चांदेरे यांनी जोर लावला आहे.
महायुतीतील भाजपचे संभाव्य उमेदवार किरण दगडे यांनी अल्पावधीत भोर-वेल्हा-मुळशीमध्ये ओळख निर्माण केली. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचा घरोबा असल्याने भाजपला जागा मिळणार असा ठाम विश्वास त्यांना आहे. भाजपला जागा मिळाली नाही तरी निवडणुकीत उभे राहणारच अशी त्यांच्याबद्दल चर्चा आहे.
चुरशीची लढत झाली तर भोरमधून दोन व मुळशीमधून दोन उमेदवार असणार आहेत. भोर- वेल्हा- मुळशीचे मतदार 4 लाख 26 हजारांच्या आसपास आहे. मतदार यादीतील अद्याप महसूल खात्याकडून आकडेवारी जाहीर होत नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार भोर- वेल्हा 2 लाख 23 हजार व मुळशी 2 लाख 23 हजारांच्या आसपास मतदार आहे. भोर-वेल्ह्याच्या बरोबरीचे मतदान मुळशीचे आहे.
मतदारसंघातील लढत कशी असणार, उमेदवारांच्या मागील मतांचे पाठबळ कोणते, रणनीती कशी असणार हे लवकरच कळणार आहे. यंदाची येणारी दिवाळी निवडणुकांमध्ये असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कोण ताकद लावणार त्याकडे कल मिळणार आहेच. घोडेबाजारातील मोहरा कोण होणार याकडे सध्या भोर- वेल्हा- मुळशीच्या सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.