पुणे: झणझणीत अन् तर्रीबाज मिसळवर ताव मारणारे पुणेकर.. नाशिक व कोल्हापूरच्या मिसळचा आस्वाद घेण्याची अनेकांनी साधलेली संधी.. पोटभर मिसळ, गुळाची जिलेबी, चविष्ट कुल्फी आणि ताकाचा घोट घेतल्यानंतर खवय्यांच्या चेहर्यावर उमटलेले समाधान असे उत्साही वातावरण शनिवारी (दि. 1) ऑक्सिरीच प्रायोजित दै. ‘पुढारी’ महामिसळ महोत्सव सीझन चारच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाले.
पुणे असो, कोल्हापूर असो वा नाशिक.. विविध ठिकाणच्या मिसळींचा आस्वाद खवय्यांना घेता आला. गरमागरम मिसळचा आनंद लुटण्यासाठी खवय्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. दै. ‘पुढारी’ महामिसळ महोत्सवाचे उद्घाटन पुण्याचे सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी जाधव, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मुख्याध्यापिका किरण राव आणि कात्रज डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
या वेळी पुणेकरांनी मिसळसोबत सुरेल गीतांची सफरही अनुभवली. गायक किरण देशमुख आणि गायिका सोनाली कोरडे यांनी बहारदार गीते सादर केली. या वेळी ‘कस्तुरी क्लब’च्या योगिनी बागडे, हर्षदा शाह, अश्विनी वायदंडे, हर्षाली सोरटे, स्वरा सिन्नरकर, पूजा ग्रामपुरोहित या महिलांनी केलेल्या सादरीकरणाला खवय्यांनी भरभरून दाद दिली.
आजही रविवारी (दि. 2) खवय्यांना आपल्या परिवारासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत सकाळी साडेआठ ते रात्री साडेदहा या वेळेत महोत्सवामध्ये सहभागी होता येणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर पुलाजवळील नाहटा लॉन्स येथे महोत्सव होत असून, महोत्सवात रविवारी सायंकाळी सहा वाजता गुलकंद या नवीन चित्रपटातील दिग्गज कलाकार अभिनेते समीर चौगुले, अभिनेत्री ईशा डे व दिग्दर्शक सचिन गोस्वामी भेट देणार आहेत.
गुलकंद चित्रपटाची टीम देणार मिसळ महोत्सवाला भेट
दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीनं मांडणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. समीर चौगुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांचा उत्तम मिलाप या चित्रपटात आहे. त्यापार्श्वभूमीवर या चित्रपटातील अभिनेता समीर चौगुले, अभिनेत्री ईशा डे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे आज (दि. 2) मिसळ महोत्सवाला भेट देत खवय्यांशी संवाद साधणार आहेत.
काळा, लाल रस्सा, मिसळ पुरी, गावरान दही, चटण्या अन् बरंच काही
महोत्सवात काळ्या-तांबड्या मसाल्यासह कोकणी हिरव्या वाटणाच्या रश्श्यावर ताव मारण्यासाठी खवय्यांची पावले महामिसळ महोत्सवाकडे वळत आहेत. महोत्सवात चविष्ट शेव व फरसाण खवय्यांच्या तोंडाला पाणी आणत आहेत. याखेरीज, चीज मिसळ, मिसळ पाणीपुरी, वर्हाडी मिसळ तसेच पाव, ब्रेड याशिवाय भाकरीबरोबर मिळणार्या मिसळीलाही पुणेकरांची पसंती मिळत आहे. मिसळ महोत्सवात गावरान दही, फ्लेवर्ड मिल्क, ताक, लस्सीचा आस्वाद घेण्यासह बचतगटांची उत्पादने कुरडई, पापड्या, खाकरे व चटण्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
पुढारी मीडिया समूह हा प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल माध्यमांमार्फत शहर, राज्य तसेच जगाच्या कानाकोपर्यांत पोहोचत आहे. महोत्सवात एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ असल्याने खवय्यांना नक्कीच मिसळ खाण्याची पर्वणी ‘पुढारी’ने उपलब्ध करून दिली आहे. पुणेकर खवय्यांना खाण्याची खूप आवड आहे. मिसळ तर पुणेकरांचा आवडता पदार्थ असून, यंदा दोन दिवस आयोजित केलेला हा महोत्सव दरवर्षी साजरा व्हावा. तसेच, त्याचे स्वरूप दरवर्षी वाढत जाऊन हा महोत्सव राज्यपातळीवर पोहोचावा यासाठी आयोजकांना शुभेच्छा. वेगवेगळ्या ठिकाणच्या मिसळ खवय्यांना खायला मिळत असल्याने खवय्यांनी कुटुंबीयांसह नक्कीच महोत्सवाला भेट द्यावी.
- रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त.
पुणे, कोल्हापूर तसेच नाशिकची प्रसिध्द मिसळ एकाच छताखाली मिळाल्याने खवय्यांना एक पर्वणी अनुभवता येत आहे. येथे अनेक स्टार्टअप पाहायला मिळाले, हे पाहून खूप चांगले वाटले. मराठी खाद्यसंस्कृतीला ‘पुढारी’ वाव देत आहे. मिसळ म्हणजे ‘पुढारी’ची ओळख बनली आहे. याखेरीज, फ्लेवर्ड मिल्क, कुल्फी, चहा, मुखवास अन्य खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. दै. ‘पुढारी’सह कात्रज दूध संघाची नाळ शहरासह ग्रामीण भागाशी घट्ट जोडली आहे. शहरासह ग्रामीण भागापर्यंत दै. ‘पुढारी’ने राबविलेल्या कस्तुरी क्लब, मिसळ महोत्सव, राईज अप महिला क्रीडा स्पर्धा, स्टार्टअप आणि पुढारी एक्स्पोमार्फत नाळ आणखी घट्ट होत आहे.
- मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक, कात्रज डेअरी.