महाळुंगे: खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील महाळुंगे, कुरुळी, निघोजे, मोई परिसरात भूजलपातळी खालावल्याने बोअर, विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. यामुळे या भागात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई सुरू झाली असून, टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
महाळुंगे, कुरुळी, मोई, निघोजे, खालुम्ब्रे परिसरात पूर्वी बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. इंद्रायणी नदीवरून थेट शेतीला पाणी येत असल्याने बोअरवेल, विहिरींमध्ये भरपूर पाणी असायचे. त्यामुळे या परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत नव्हता. परंतु, आता औद्योगीकरणामुळे शेती कमी होऊन येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत वाढ झाली आहे.
प्रत्येकाने बोअरवेल घेतल्याने भूगर्भातील पाणीही कमी झाले आहे. त्यातच उन्हाचा चटका वाढला असून, बोअरवेल, विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. परिणामी फेब्रुवारीतच टँकरची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये पाण्याचे संकट तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तापमानवाढीमुळे पाण्याचे स्रोत आटू लागले
तापमानवाढीमुळे ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत आटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरण झाले आहे. येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे.
पूर्वी इंद्रायणी नदीवरून आजूबाजूच्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या. परंतु, नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने पाण्यासाठी बोअरचे, विहिरींचे पाणी वापरावे लागत आहे. परंतु, हे पाणी देखील आता कमी होऊ लागले आहे.
जलजीवन मिशनची कामे अपूर्ण
मागील वर्षी चांगला पाऊस पडून देखील जानेवारी महिन्यापासूनच बोअरवेलने तळ गाठण्यास सुरुवात झाल्याने टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ या भागातील ग्रामस्थ व नागरिकांवर आली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या जलजीवन मिशनचे काम देखील अपूर्ण आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाचे चटके आणि पाण्याचा तुटवडा ही चिंतेची बाब ठरणार आहे.