

पुणे: काँग्रेसवाले आम्हाला जवळ करत नव्हते. त्यांना वाटायचे दगड उभा केला, तर तो निवडून आणू. आत्मविश्वास गमावलेल्या समाजाला पुन्हा फुंकर देण्याचे काम राजू शेट्टी, बच्चू कडू आणि मी स्वत: मिळून केले.
काँग्रेसला मस्ती चढली होती. त्यांचे 2 ते 3 टक्के मतदार फिरवून काँग्रेस आणि शरद पवारांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठीच आम्ही भाजपमध्ये गेलो होतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.
रासपच्या वतीने महादेव जानकर यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रहार संघटनेचे बच्चू कडू, अमर कदम, प्रकाश बालवडकर, काशिनाथ शेवते, कुमार सुशील, अजित पाटील, अॅड. सुधाकर जाधवर, अॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे कौटुंबिक कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जानकर यांना शुभेच्छा दिल्या.
जानकर म्हणाले, राजकारण आणि चळवळ यात खूप फरक असतो. चळवळ नेहमी शेतकरी आणि उपेक्षितांच्या बाजूने उभी राहते. मात्र, आम्हाला राजकारणात उजव्या बाजूला का उभे राहावे लागले, याचे कारण म्हणजे काँग्रेस आम्हाला महत्त्व देत नव्हती. त्यांना नेहमी वाटायचे की यांची काय गरज आहे, त्यांच्या समाजातील एखाद्याला मंत्री केले की त्यांचे काम संपले, असे त्यांचे मत होते.
भाजपबरोबर माझे कोणतेही भांडण नाही. भाजप आजही युतीत येण्याचे निमंत्रण देत आहे.पक्षाच्या वतीने माझ्या 57व्या वाढदिवसानिमित्त 57 लाख रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे माझ्या वैयक्तिक कामासाठी नसून पक्षवाढीसाठी आणि पक्ष कार्यालयासाठी वापरले जातील. 31 मे रोजी दिल्लीत अडीच कोटी रुपये खर्च करून पक्षाचे कार्यालय सुरू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.