आमदार राहुल कुल यांची महायुतीमध्ये मंत्रिपदी वर्णी लागावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने चौफुला (ता. दौंड) येथील ग्रामदैवत श्री बोरमलनाथ महाराजांना साकडे घालण्यात आले. भीमा-पाटस साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, सरपंच बाळासाहेब सोडनवर, कैलास शेलार यांच्या उपस्थितीत श्री बोरमलनाथ महाराज मंदिरात महाभिषेक करण्यात आला.
कुल हे दौंड मतदारसंघातून सलग तिसर्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी हक्कभंग समितीचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. त्यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाला मंत्रिपदी संधी देण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून दौंडमधील जनता करत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी कुल यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, त्यांना मंत्री करतो, अशी घोषणा केली होती. कुल हे निवडून आल्याने त्यांना मंत्री करावे, अशी मागणी मतदारांनी केली आहे.
याबाबत आनंद थोरात म्हणाले की, आमदार कुल यांचा पाण्याबाबत मोठा अभ्यास आहे. मुळशीचे पाणी दौंडला आणा, असे विधिमंडळात सांगणारे ते एकमेव आमदार आहेत. त्यामुळे कुल यांना जलसंपदा खाते मिळावे, अशी आमची मागणी आहे.
या प्रसंगी अभिषेक थोरात, दिनेश गडधे, जालिंदर काटे, रोहिदास राजपुरे, शुभम मारकड, दत्तात्रेय गडधे, धनंजय थोरात, योगेश कोळपे, परशुराम शेळके, विकास सोडनवर आदी उपस्थित होते.