शिरूर: पुढारी वृत्तसेवा
शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका युवतीला दोघांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच दोघांनी अत्याचार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार (शनिवार) रात्री घडला. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत २ तासाच्या आत संशयित दोन नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमोल नारायण पोटे (वय २५, रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार बिल्डींग, कारेगाव ता. शिरुर जि. पुणे, मुळ रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि. अहिल्यानगर) व किशोर रामभाऊ काळे (वय २९, रा. संस्कृती डेव्हलपर्स, लेन नं.१, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे, मुळ रा. किल्ले धारुर, ता.धारुर जि. बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
रांजणगाव एमआआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, परराज्यातील पीडित युवती करेगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे आली होती. तिच्या आत्येभावासोबत शनिवारी (दि. १) रात्री 10.30 च्या सुमारास घरापासून 300 मिटर अंतरावर गप्पा मारत बसली होती. यावेळी संशयित दोघे त्या ठिकाणी आले. त्यांनी युवतीची छेड काढण्यास सुरुवात केली. आत्येभावाने विरोध केला असता चाकूचा धाक दाखवत दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व या युवकास दुसऱ्या ठिकाणी थांबण्यास सांगून दोघांनी आळीपाळीने तरूणीवर सामूहिक आत्याचार केले.
तिच्या अंगावरील सोने लुबाडून तेथून पळ काढला. पीडितीने घरी आल्यावर आपल्या बहिणीला सर्व प्रकार सांगितला. या नंतर बहिणीच्या नवऱ्याने पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. काही मिनिटात रांजणगाव एमआआयडीसी पोलीस घटनास्थळी आले. पीडितेने केलेल्या वर्णनावरून सीसीटीव्ही तपासत अवघ्या दोन तासात संशयित आरोपींना करेगाव येथून अटक केली आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार, महिला पोलीस अधिकारी सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस कर्मचारी वैभव मोरे, उमेश कुतवळ, अभिमान कोळेकर, दत्तात्रय शिंदे, माऊली शिंदे, अजित पवार, संदीप मांड, संतोष अडसूळ व महिला पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित आरोपींना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.

