पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा असल्याचे चित्र गुरुवारी (दि.10) पाहायला मिळाले. तिकीट खिडक्यांपासून सुमारे 80 ते 100 मीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. भरउन्हात अशा रांगेत उभे राहावे लागल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेच्या पुणे स्थानकासह विभागातील सर्वच्या सर्व स्थानकांवरून बाहेरगावी जाण्यासाठी प्रचंड गर्दी वाढलेली आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने ज्यादा रेल्वे गाड्या आणि गर्दी नियोजनासाठी पथकांची नियुक्ती केली आहे.
नोडल अधिकार्यांच्या अखत्यारित गर्दी नियंत्रणाचे काम सुरू आहे. परंतु, तिकीट खिडक्यांवरील गर्दी नियोजनासाठी पुणे रेल्वे स्थानकावर काहीच केले नसल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. दै. ‘पुढारी’च्या वतीने गुरुवारी पुणे रेल्वे स्थानकावर पाहणी करण्यात आली.
नेहमी होणारी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील गर्दी कमी झाल्याचे चित्र होते. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 / 3 वर गोरखपूर एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेसाठी प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच, मुख्य प्रवेशद्वार एक शेजारील सर्वच्या सर्व तिकीट खिडक्यांवर सायंकाळच्या सुमारास लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच, अंब-ेला गेट शेजारील इमारतीमध्ये तळमजल्यावर असलेल्या तिकीट खिडक्यांनादेखील प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ऐन उन्हाळ्यात गर्दीच्या काळात तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली आहे. अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे. तिकीट तपासणी, आरपीएफ जवानांचे संख्याबळ वाढवले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तीन काऊंटर सुरू केले आहेत. गरज लागल्यास आणखी तिकीट काऊंटर वाढवले जातील.
हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे
उन्हाळी सुट्यांमुळे प्रवासी बाहेरगावी पर्यटनासाठी तसेच आपल्या मूळ गावी निघाले आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. तिकीट खिडक्यांवरदेखील प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी वेटिंग करावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांकरिता अतिरिक्त तिकीट खिडक्या आणि वेंडिंग मशीन उपलब्ध करून द्याव्यात.
आनंद सप्तर्षी, सदस्य, प्रादेशिक सल्लागार समिती