पुणे : निवडणुकीच्या राजकारणाने नात्यांचाही गुंता करून ठेवला आहे. असाच काहीसा गुंता पुण्याच्या राजकारणात झाला आहे. तरीही वेगवेगळ्या राजकीय पक्षात असूनही एकमेकांची नाती सांभाळत अनेक मंडळी आपापली राजकीय भूमिका यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. त्यामुळे सुरेश भटांच्या कवितेतील 'रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा !, गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा' या पंक्तीनुसार राजकारण पुण्यातील मंंडळींनी चालविले आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुटुंबातील आणि नात्यांमधील कलहाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजकारणामुळे कुटुंबात आणि नात्यातही फूट पडल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, पुण्यातील राजकीय संस्कृतपणाने अद्यापही अनेक मोठ्या घराण्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून नाती- गोती जपली असल्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणूक लढविणार्या उमेदवारांपासून याची सुरुवात होत आहे.
पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची पुतणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पा रेणुसे यांच्या कुटुंबात दिली आहे. तर रेणुसे आणि चिंचवडच्या भाजपच्या आमदार आश्विनी जगताप यांचे दोन पिढ्यांचे नातेसंबंध आहेत. आधी सर्व एकाच पक्षात आणि नंतर वेगवेगळ्या पक्षात असून, ही नाती अधिक घट्ट होत गेल्याचे पाहायला मिळते. तर जगताप कुटुंबीय आणि मंत्री तानाजी सावंत यांचे सख्य नाते आहे. जगताप आणि खेडचे माजी आमदार स्व. नारायण पवार कुटुंबाशी नातेसंबंध आहेत. पवार आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे हे सख्ये साडू होत. तर बारणे यांचे दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल, पुण्यातील काँग्रेसचे बालगुडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मस्के यांचे अगदी जवळचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत.
मस्के यांची स्नुषा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची कन्या. तर शिंदे यांची स्नुषा ही भाजपचे माजी नगरसेवक अजय खेडेकर यांची पुतणी आहे, तर खेडेकर यांची सून आमदार माधुरी मिसाळ यांची पुतणी आहे. नात्यांच्या या धाग्यात माजी महापौर दत्ता धनकवडे यांची बहीण मस्के कुटुंबात दिली आहे. तर म्हस्के आणि मुंढव्यातील गायकवाड यांचेही नातेसंबंध आहेत. विशेष म्हणजे गायकवाड कुटुंबात माजी नगरसेवक बंडु गायकवाड हे शरद पवार यांच्या समवेत आहेत. तर त्यांचे पुतणे उमेश गायकवाड हे भाजपमध्ये सक्रिय आहेत. असे असतानाही हे कुटुंब एकत्र नांदत आहे. सातार्याचे लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि गायकवाड यांचेही जवळचे नातेसंबंध आहेत.
या पद्धतीने भाजपचे माजी खासदार संजय काकडे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले हे व्याही आहेत, तर काकडे आणि सोलापूरचे सुभाष देशमुख हे व्याही आहेत. कोथरूडचे सेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि भाजपचे वेडेपाटील हे एकमेकांचे व्याही आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या समवेत असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी स्नुषा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय भोसले यांची कन्या आहे. तर त्यांची आणखी एक कन्या ही भाजपचे नगरसेवक सम्राट थोरात यांची पत्नी आहे.
हडपसर भागात मगर, तुपे, भोसले असे एकमेकांचे नातेवाईक असून, बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांचे आमदार रोहित पवार हे जावई आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचे भाजपचे आमदार महेश लांडगे हे भाचे जावई आहेत. तर शिवसेना ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांचे स्थानिक पातळीवर लांडे, काटे याच्यांशी नातेसंबंध आहेत.अशा पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या मंडळींचे नातेसंबंध आहेत. मात्र, अपवाद वगळता नात्यांना धक्का न लावता याउलट एकमेकांना मदत करत ही मंडळी राजकारण करत असल्याचे दिसून येते.
हेही वाचा