

बारामती : पुढारी वृत्तसेवा : भाजपने गेल्या दोन वर्षांत राज्यात फोडाफोडीचे राजकारण केले. आधी शिवसेना पक्ष फोडला. त्यासाठी प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये दिले. त्यानंतर कशाची तरी भीती दाखवत राष्ट्रवादी फोडण्यात आली, फोडाफोडीला जनता कंटाळली असून, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ती उत्तर देईल, असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. बारामतीत गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त सेवा समितीच्या पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश देशमुख यांनी घडवून आणला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हा समाज लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मविआच्या मागे खंबीर उभा राहील, असे देशमुख यांनी सांगितले.
पुत्र व कन्येच्या प्रेमापोटी शिवसेना व राष्ट्रवादी फुटली या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या टिकेला देशमुख यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, प्रत्येक आमदाराला 50 कोटी देऊन शिवसेना, तर आमच्या वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले हे देशाला माहीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात तोडफोडीचे राजकारण सुरू आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. ईडी, सीबीआयची भीती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत जनता याचे उत्तर देईल. येत्या निवडणुकीत आघाडीला राज्यात 40 जागा मिळतील.
राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. आमचे जे लोक त्यांच्यासोबत गेले आहेत त्यातील अनेकांना आपली दिशाभूल झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यातील अनेकांची घरवापसी होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.
भाजपने पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली. या सगळ्यात भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी आहेत. ते आम्हाला तसे बोलून दाखवत आहेत. बाहेरून येणारे पहिल्या पंक्तीत बसले. आम्ही मूळचे असून बाजूला, असे सांगत भाजप आमदार नाराजी व्यक्त करत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
हेही वाचा