

पुणे : लोककला-लोकनाट्याच्या नावाखाली राज्यात काही सांस्कृतिक केंद्रांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. डीजेचा वापर करून अश्लिल नृत्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे खऱ्या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोककला केंद्रात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर बंदी आणावी, अशी मागणी राज्यस्तरीय अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेने पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र तमाशा थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव, महाराष्ट्र तमाशा कलावंताचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, जय अंबिका कला केंद्राच्या संचालिका सुरेखा पवार यांसह मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत लाखे यांनी स्पष्ट केले की, संगीतबारीवरील पारंपरिक वाद्यांचा वापर करून सादर होणाऱ्या नृत्यातील कलाकेंद्रे अनेक पिढ्यांनी जोपासली आहेत. भातू कोल्हाटी, डोबांरी कोल्हाटी, आणि कळवात यांसारख्या कलाकारांनी लोककलेला मोठा वाव दिला आहे. त्याचप्रमाणे, पद्मश्री यमुनाबाई वाईकर, कौशल्याबाई कोपरगावकर, आणि गुलाबताई संगमनेरकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या परंपरेला उंचीवर नेले आहे. तथापि, मागील काही महिन्यांपासून सांस्कृतिक केंद्रांमध्ये सुरु असलेल्या अशा गैरप्रकारांमुळे लोककला जोपासणाऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलत चालले आहे.
डॉ. अशोक जाधव यांनी यावर आपले मत व्यक्त करत सांगितले की, लोककला जोपासणाऱ्या कलाकेंद्रांची व कलाकारांची नाहक बदनामी होत आहे. अशा गैरप्रकारांना फेटाळण्यासाठी संबंधित केंद्रांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे.