पुणे: गीतरामायणनिर्मितीच्या वेळच्या किस्से-रंजक प्रसंगांचा समावेश असलेला ‘असे साकारले गीतरामायण’ हा कार्यक्रम आज मंगळवारी (दि. 8 एप्रिल) होत असून, त्याबाबत शेकडो रसिकांमध्ये औत्सुक्याची भावना निर्माण झाली आहे. ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके आणि गायक आनंद माडगूळकर आपल्या सहकार्यांसह हा कार्यक्रम सादर करतील.
‘पुढारी’ माध्यमसमूह आयोजित आणि भारती विद्यापीठ प्रायोजित अशा या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर आहेत पुणे पीपल्स बँक, तर प्रेझेंटिंग पार्टनर कोहिनूर ग्रुप हे आहेत. तसेच, सहप्रायोजक आहेत पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिऑलॉजी सेंटर आणि हेल्थ पार्टनर आहेत प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट.
गीतरामायणाची रचना झाली, त्याला संगीत दिले गेले, त्याचे ध्वनिमुद्रण झाले आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून त्याचे प्रथम प्रसारण झाले, त्या प्रत्येक टप्प्यात अनेक रंजक घटना घडल्या. अक्षरश: दंतकथा शोभतील, ऐकणार्याला नवल वाटेल असे प्रसंग या काळात घडले. असे गीतरामायणाचे अनेक किस्से, प्रसंग या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत.
गीतरामायण रचले ते ‘महाराष्ट्राचे वाल्मीकी’ अशी पदवी जनमानसाने दिलेले ग. दि. माडगूळकर यांनी आणि त्याला संगीत दिले ते ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके ऊर्फ बाबुजींनी. गीरामायणाच्या निर्मिती आणि सादरीकरणादरम्यान घडलेल्या प्रसंगांना उजाळा देणार आहेत ते गदिमापुत्र आनंद माडगूळकर आणि बाबुजीपुत्र तसेच ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके. हे ऐकावेसे वाटणारे प्रसंग सांगत असताना हे दोघेही गीतरामायणाचे गायनही करणार आहेत.
कार्यक्रम कोणता?
आनंद माडगूळकर आणि श्रीधर फडके यांनी आपल्या सहकार्यांसह सादर केलेला ‘असे साकारले गीतरामायण’
कुठे आणि कधी?
सातारा रस्त्यावरील बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे प्रेक्षागृहात आज मंगळवारी, 8 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता.