

आळंदी: देहू-आळंदी रस्त्यावर आळंदी येथे विदेशी दारूच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून बाटल्यांचे बॉक्स खाली पडल्याची घटना उघडकीस आली आहे. यात पडलेल्या बाटल्या उचलण्यासाठी तळीरामांची धांदल उडाल्याचे दिसून आले. आळंदी देवाची हद्दीत देहूफाटा चौकात सदर प्रकार घडला.
मोशीकडून आलेल्या व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमधून विदेशी दारूच्या बाटल्यांचे पाच ते सहा बॉक्स रस्त्यावर पडण्यास सुरुवात झाली. काही अंतराने किमान पाच ते सहा बॉक्स रस्त्यावर पडले. तळीरामानी बाटल्या उचलण्यासाठी धावपळ केली; मात्र वाहतूक पोलिसांनी या बाटल्या ताब्यात घेत तपास सुरू केला. (Latest Pune News)
एकंदरीतच आळंदी परिसरात दारू विक्रीला परवानगी नसल्याचे सांगितले जात असले तरी या भागात अवैध धंदे फोफावल्याचे दिसून येत आहे. याच कारणातून हा ट्रक या रस्त्यावर आला असावा आणि त्याच वाहतुकीत हे बॉक्स रस्त्यावर पडले असावे, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.