Crime News: महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्स्पोर्ट व सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणातील सहा जणांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी 13 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॅलिस्टिक एक्स्पर्टच्या अहवालाआधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला. दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल लक्ष्मण सपकाळ, अमर दिनकर शेवाळे, अमोल नारायण शिंदे, प्रकाशसिंग चंदनसिंग बायस आणि श्याम चंद्रकांत जगताप, अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत.
आरोपींकडून तीन पिस्तुले आणि तीन कोयते जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात सहायक सरकारी वकील मारुती वाडेकर यांच्याकडून 22 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॅलिस्टिक एक्सपर्टसचा अहवाल महत्त्वाचा पुरावा ठरला. या प्रकरणात फिर्यादी देखील जखमी झाले होते.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक आर. बी. उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बिलाल शेख तसेच कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक गोविंद मरभळ, हवालदार अनिल जगताप यांनी काम पाहिले. 10 डिसेंबर 2014 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रकाश चव्हाण पूर्णानगर येथील सलूनमध्ये गेला. त्या वेळी हल्लेखोर सलूनबाहेर दबा धरून बसले होते. चव्हाण सलूनच्या बाहेर येताच आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला.
तसेच, धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चव्हाणला रुग्णलयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या हल्ल्यात प्रकाश चव्हाण याचे अंगरक्षक देखील जखमी झाले. तसेच, एका आरोपीचा घटनेदरम्यान अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान चव्हाण याची स्वतःची एक गुन्हेगारी टोळी होती.
टोळीचा म्होरक्या चव्हाण याची परिसरात दहशत होती. या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून चव्हाणचा गेम करण्याचा प्लॅन केला. त्यानुसार प्रकाश चव्हाण याच्या हालचालींवर आरोपी पाळत ठेवून होते, असे निष्पन्न झाले होते.