वाघोलीतील भाडळेवस्ती डिकॅथलॉन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या अखेर पिंजर्यात जेरबंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे. परंतु, कोलवडी, मांजरी परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुणे-नगर महामार्गालगत असणार्या भाडळेवस्ती परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॉमेर्यात कैद झाला होता. तसेच, बिबट्याने मेढ्यांवर हल्लाही केला होता. नागरी भागात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. वन विभागाच्या कर्मचार्यांनी परिसरात लावलेल्या पिंजर्यात अखेर हा बिबट्या जेरबंद झाला आहे.
दरम्यान, कोलवडी, मांजरी भागांमध्येही बिबट्याची दहशत अजूनही कायम असून, या ठिकाणी बिबट्याकडून प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. कोलवडी येथील पवारवस्तीवर शेतकरी मनोहर कुंडलिक पवार यांच्या गोठ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात म्हशीचे पारडू ठार झाले आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांच्याच गोठ्यातील वासरासह एका कुत्र्याला बिबट्याने ठार केल्याचे माजी सैनिक शिवाजी पवार यांनी सांगितले. वन विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी किशोर उंद्रे, विनायक गायकवाड, विकास गायकवाड, आप्पासाहेब मुरकुटे, बाजीराव भालसिंग, राजेंद्र भालसिंग, योगेश मुरकुटे, सुभाष जोरे यांनी केली आहे. या भागात लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
वाघोलीतील भाडळेवस्ती येथे काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाला कळवताच पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्यात आले. मात्र, मांजरी, कोलवडी परिसरात अनेक जनावरे बिबट्याने फस्त केली असताना पिंजरा लावण्यासाठी वन विभाग टाळाटाळ करीत आहे.
अशोक आव्हाळे, शेतकरी, मांजरी