पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात बिबट्या ठार

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात बिबट्या ठार

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव जवळील काळेवाडी नंबर २ (ता. इंदापूर) येथे बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि. २) रात्री घडली.

अचानक रस्त्यावर बिबट्या आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो काही काळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. रस्त्यावर वाहनांची व प्रवाशांची गर्दी झाल्याने भिगवणला कामानिमित्त गेलेले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार जाधव, सागर ढगे, शंकर भोंग यांनी तो कोणता प्राणी आहे? हे पाहण्यासाठी गर्दीकडे तातडीने धाव घेतली. त्यांना तो बिबट्या असल्याची खात्री झाली. त्यांनी वन विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांना ही माहिती दिली. त्यानंतर तातडीने त्या बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तो गतप्राण झाला होता.

मागील आठ दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयाच्या भीमा नदीकाठच्या पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला स्थानिक नागरिकांनी दिली होती, असा दुजोरा इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांनी दिला. घटनास्थळी जाऊन पंचनामा करून त्या मृत बिबट्यास ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बिबट्याचा वावर मागील काही महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात वाढल्याचे दिसून येत असतानाच अचानकपणे अपघातात बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने प्राणिप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news