आंबेगाव : कारमळ्यात ऊस तोडणी सुरू असताना आढळले बिबट्याचे बछडे

आंबेगाव : कारमळ्यात ऊस तोडणी सुरू असताना आढळले बिबट्याचे बछडे

पारगाव : पुढारी वृत्तसेवा रांजणी (ता. आंबेगाव) येथील कारमळ्यात जुनी विहीर वस्तीत ऊसतोड सुरू असताना दोन बिबट बछडे आढळून आले. ही घटना आज (रविवार) सकाळी आठ वाजता उघडकीस आली. यामुळे ऊस तोडणीचे काम थांबवण्यात आले आहे. वनविभागाने दोन्ही बिबट बछडे ताब्यात घेऊन त्यांना अवसरी घाट येथील वनसावित्री उद्यानात सुरक्षितरित्या हलवले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कारमळा येथील जुनीविहीर वस्तीत सुनील बबन वाघ व सदाशिव बापू वाघ यांच्या शेतात गेली पाच-सहा दिवसांपासून उसाची तोड सुरू आहे. आज (रविवार) सकाळी ऊसतोड कामगारांनी ऊस तोडणीला सुरुवात केली. त्यावेळी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये घबराट पसरली. मुकादम अर्जुन पंढरीनाथ जाधव यांनी कारखाना प्रशासनाला ही माहिती दिली.

भीमाशंकर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. वनविभागाला ही माहिती देण्यात आली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय वेलकर, वनरक्षक पी. के. पवार, वनमजूर महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही बिबट बछड्यांना ताब्यात घेतले. हे दोन्ही बछडे अंदाजे दोन अडीच महिन्याचे आहेत. त्यांना अवसरी घाट येथील वनसावित्री उद्यानात सुरक्षितरित्या देखरेखी खाली ठेवले जाणार आहे.

रविवारी (दि. १७) सायंकाळीच उशिरा पुन्हा त्याच उसाच्या शेतामध्ये बिबट मादीजवळ दोन्ही बछडे सोडण्यात येणार असल्याचे वनरक्षक पी. के. पवार यांनी सांगितले. दरम्यान कारमळा येथील सुनील वाघ, सदाशिव वाघ यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बिबट बछडे आढळून आल्याने उसतोडणीचे काम थांबवण्यात आल्याचे भीमाशंकर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news