आळेफाटा: पुढारी वृत्तसेवा : पिंपळवंडी (ता. जुन्नर) शिवारातील तोतरबेट येथे मंगळवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १८ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणारी तरूणी जखमी झाली असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. याबाबत माहिती अशी पिंपळवंडी येथील तोतरबेट येथे सूर्यकांत सखाराम तोतरे यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. सायंकाळी तोडलेल्या ऊसाच्या मोळ्या गाडीमध्ये मजूर भरत असताना साडेसहा वाजेच्या दरम्यान ऊसाच्या शेतात असलेल्या बिबट्याने रितू श्यामराव गांगुर्डे (वय १८ मुळ रा. चाळीसगाव) या तरुणीवर अचानक हल्ला केला.
यावेळी तेथे असलेल्या ऊस तोडणी मजुरांनी आरडाओरडा करत हातात कोयता व ऊस घेत रितुकडे धाव घेतली तसेच रितू गांगुर्डे हिनेही आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान यावेळी बिबट्याच्या पंजाच्या नख्यांनी रितु गांगुर्डे हिच्या डोक्यावर, खांद्यावर व पाठीवर जखमा झाल्या. यानंतर तातडीने रितु हिस उपचारासाठी पिंपरीपेंढार येथील दवाखान्यात नेत वनविभागास ऊसतोड मजुरांनी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी तातडीने घटनास्थळी आळे वनपरिक्षेत्रेचे वनपाल संतोष साळुंखे वनसेवक बी के खर्गे, रोशन नवले तातडीने घटनास्थळी पाठवले.
त्यांनी तात्काळ रितु हीस नारायणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पिंपळवंडी परिसरात ऊसाचे मोठे क्षेत्र असून या परिसरात बिबट्याचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. पिंपळवंडी येथे महिन्यापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यातून एक तरुण प्रसंगावधान दाखवल्याने बचावला होता. तसेच या परिसरात पशुधन व पाळीव प्राणी ठार होत असल्याच्या घटनाही घडत आहेत.
तोतरबेट परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
हेही वाचा