

पुणे: छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटात शिर्के यांच्याबाबत दाखविलेल्या माहितीबद्दल शिर्के घराण्याच्या वंशजांनी शुक्रवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत आक्षेप घेतला. आमच्या शिर्के घराण्याची बदनामी करण्यात आली असून, इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आक्षेपानंतर ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
‘छावा’ चित्रपट सध्या वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत आहे. पण, चित्रपटातील एका सीनबाबत शिर्के घराण्याच्या वंशजांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला. त्यांच्या या आक्षेपानंतर याबाबत लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
तसेच, हा प्रसंग कसा दाखवला आहे आणि त्यामागील उद्देश काय आहे याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. भूषण शिर्के यांच्याशी उतेकर यांनी दूरध्वनीवरून केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप वृत्तवाहिन्यांमधून ऐकवण्यात येत आहे. त्यात उतेकर यांनी शिर्के कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण उतेकर म्हणाले, भूषणजी मी तुमची पत्रकार परिषद पाहिली आणि तुमचा मेसेजही मी वाचला. सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो आणि मी तुमच्या मेसेजला प्रामाणिकपणे उत्तरही देऊ इच्छितो.
गणोजी आणि कान्होजी या केवळ एकल नावाने फक्त चित्रपटात त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांचे आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलेले नाही, त्यांचे गाव कोणते हे आपण अजिबात दाखवलेले नाही. ही खबरदारी मी नक्कीच घेतली आहे, अशा शब्दांत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. चित्रपटातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही. काही वाटले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे लक्ष्मण उतेकर यांनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.