बारामती: ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आम्ही लोकशाही मार्गाने राज्यभर मोर्चे, आंदोलने काढत आहोत. परंतु बारामतीतच आमच्यावर गुन्हा दाखल का, असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळेच गुन्हा दाखल झाल्याचे ते म्हणाले.
बारामतीत 5 सप्टेंबर रोजी ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन केले गेले होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे 14 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व गुरुवारी (दि. 25) शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. यानंतर हाके पत्रकारांशी बोलत होते. (Latest Pune News)
बारामतीत पोलिसांनी असा गुन्हा पुन्हा करू नये, असे आमच्याकडून लिहून घेतले. मग उद्यापासून आम्ही भाषणे करू नयेत का, लोकशाही मार्गाने आमचे आरक्षण वाचवू नये का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अजित पवार हे बीड व पुण्याचे पालकमंत्री आहेत, या दोनच जिल्ह्यात माझ्यावर गुन्हे दाखल होतात, हल्ले होतात, या मागे कोण आहे असा सवाल करून हाके म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत, गाड्या जाळल्या जात आहेत.
दुसरीकडे अजित पवार यांनी आमच्या निधीवर डल्ला मारून दारूचे कारखाने काढले आहेत. महाज्योतीसंबंधीच्या प्रश्नाला अर्थमंत्री पवार उत्तर देतात म्हणून आम्ही त्यांनाच जाब विचारणार. मराठा आरक्षणासंबंधीचा जीआर आम्ही फाडला त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही जबाबदार धरत आहोत.
महाराष्ट्रातील सत्तेत पवार हे नेहमीच बसलेले आहेत. परंतु, मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यावर शरद पवार यांना सामाजिक वीण उसवल्याची जाण झाली का, असा सवाल त्यांनी केला.
आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची
ओबीसी आरक्षणप्रश्नी गुन्हा दाखल झालेल्या हाके यांच्यासह 14 आंदोलकांना शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या कक्षात बोलावून घेत नोटीसा दिल्या गेल्या. या वेळी आंदोलक व पोलिस अधिकाऱ्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही..! मात्र आम्ही संविधान सोडून काहीच केले नाही.
तरीही आमच्यावर गुन्हा दाखल का करता? अशा प्रश्नांची सरबत्ती आंदोलकांनी केली. दरम्यान, पोलिसांनी पोलिसांचे काम केले आहे. आंदोलनाला परवानगी नसतानाही आपण आंदोलन केले. त्यामुळे या नोटिसा देत आहोत, असे उत्तर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी दिले; मात्र आंदोलक आम्हाला आत्ता अटक करा. आम्हाला जामीन घ्यायचा नाही यावर ठाम होते. अखेर काही काळाच्या चर्चेनंतर ते नोटिसा घेऊन बाहेर पडले.
आंदोलकांमध्येच दोन गट
शहर पोलिस ठाण्यात चर्चा सुरू असताना काही आंदोलक हा गुन्हा पालकमंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरून दाखल झाल्याचे सांगत होते. तर राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी मात्र यात पवार यांचा संबंध नाही, त्यांची विनाकारण बदनामी नको, असे सांगत होते. यातून आंदोलकांमध्येच परस्पर संवाद विरोधाभास दिसून आला.