Weather Update : डिसेंबर ते फेब्रुवारी कडाक्याची थंडी, अधूनमधून पाऊसही पडणार
Latest Weather Update News: डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत यंदा सरासरी किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहील. संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी राहील. डिसेंबरचा पहिला आठवडा कमी थंडीचा राहील. मात्र 8 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला आहे.
हवामान विभागाने हिवाळी हंगामाचा अंदाज जाहीर केला. यात डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या तीन महिन्यांत यंदा हिवाळा कडक असेल. मात्र अधूनमधून पाऊसही पडेल. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहील.
दक्षिण भारत व काश्मिरात कमी थंडी
दक्षिण भारत आणि जम्मू-काश्मीर, लडाख या भागांत पाऊस राहणार असल्याने तेथे थंडी कमी राहील. उर्वरित भागात थंडीचा कडाका जास्त राहील.
या भागात पाऊस जास्त
तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, कोस्टल आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा, केरळ आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारत या भागात पाऊस सामान्यपेक्षा जास्त राहील. या ठिकाणी 131 टक्के (43 मि.मी.) तर देशाच्या उर्वरित भागात 121 टक्के पाऊस राहील. (15 मि.मी.)
पाच जिल्ह्यांत 5 डिसेंबरला पाऊस
महाराष्ट्रात 5 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे त्या भागात थंडी कमी राहील. राज्यात 7 डिसेंबरपर्यंत किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी राहील. मात्र त्यानंतर 8 पासून पुन्हा थंडीचा कडाका सुरू होईल.
सोमवारचे राज्याचे किमान तापमान
ब्रह्मपुरी 14.5,नाशिक 14.6,पुणे 17.4,मुंबई 22.8, 23.9, जळगाव 14.8, कोल्हापूर 21.7,महाबळेश्वर 16.4, सांगली 20.3, सातारा 21.5, सोलापूर 21.0,छ. संभाजीनगर 20.6, परभणी 19,अकोला 21.7, अमरावती 19.7, बुलडाणा 19.2, चंद्रपूर 16, गोंदिया 18.6, नागपूर 18.4, वाशिम 14.6.

