

Diwali 2024: उजळलेला आसमंत, विद्युतरोषणाईने झगमगलेली घरे, पारंपरिक मराठमोळ्या पेहरावात सहकुटुंब केलेले लक्ष्मीपूजन, कुटुंबात फुललेली आनंदाची पालवी अन् रात्रीपर्यंत सुरू असलेले दिवाळीचे सेलिब्रेशन असे जल्लोषपूर्ण वातावरण शुक्रवारी (दि. 1) शहरात लक्ष्मीपूजनाला पाहायला मिळणार असून, तेजोमय दिवाळी, उत्साहाची दिवाळी आनंदात साजरी केली जाणार आहे. अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशमान व्हावे, अशी प्रार्थना केली जाणार आहे.
दिव्यांच्या लख्ख प्रकाशात घरे उजळणार आहेत. दिवाळीच्या तेजोमय पर्वानिमित्त आनंदाला उधाण आले आहे. लक्ष्मीपूजनासाठी दुपारी तीन ते रात्री पावणेअकरापर्यंतचा मुहूर्त आहे. प्रकाशपर्वानिमित्त अख्खे पुणे शहर आनंदात न्हाऊन गेले आहे. दिवाळीच्या प्रकाशपर्वाचा हर्ष सगळीकडे ओसंडून वाहत असून, दिवाळीतील महत्त्वाचा दिवस असलेले लक्ष्मीपूजनही उत्साहात केले जाणार आहे.
गुरुवारी साजरा झालेल्या नरक चतुर्दशीनंतर लक्ष्मीपूजनही तेवढ्याच जोशात साजरे होणार आहे. सकाळी सुगंधी तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान, नवीन कपडे परिधान करून सहकुटुंब पूजा-अर्चा आणि सहकुटुंब फराळाचा आस्वाद,असे वातावरण घरोघरी रंगणार आहे. सांगीतिक कार्यक्रमांतून पुणेकरांची पहाट सुरमयी होणार आहे.
सायंकाळी सहानंतर खर्या अर्थाने दिवाळीचा जोश, जल्लोष सुरू होईल. सायंकाळी ‘दारी फुलांचे तोरण, अंगणी मनोहारी रांगोळी’, दिवे-पणत्यांचा प्रकाश आणि विद्युतरोषणाईचा झगमगाट पाहायला मिळणार आहे. घरे, मठ-मंदिरे, दालने, कार्यालये अन् शहरातील रस्तेन् रस्ते प्रकाशाने उजळतील. सायंकाळ होताच नवीन कपडे परिधान करून सहकुटुंब एकत्र येऊन विधिवत पद्धतीने लक्ष्मी-कुबेरपूजन केले जाणार आहे. पूजनानंतर लहान मुलांसह तरुण फटाक्यांची आतषबाजी करणार असून, या आतषबाजीत अवघा आसमंत न्हाऊन जाणार आहे.
शहरातील व्यापारी दुपारनंतर व्यवहार थांबवून दुकाने सजवणार आहेत, लक्ष्मीपूजनासह प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या आणि दुकानातील साहित्यांची पूजा करण्यात येईल. यानिमित्ताने बाजारपेठांमध्येही उत्साह पाहायला मिळणार आहे. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटून दिवाळीच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतील. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी, चैतन्य नांदावे, असे कामनाही केली जाणार आहे. संस्था-संघटनांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मठ-मंदिरांमध्येही दिवाळीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, मंदिरेही दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार आहेत. एकूणच हर्षोल्हासात दिवाळी साजरी करण्यात येणार असून, प्रत्येकजण दिवाळीचे प्रकाशपर्व साजरे करण्यासाठी सज्ज आहे.
लक्ष्मी-कुबेरपूजन
शेतकर्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळ अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारीवर्गासाठी अश्विनमधील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे अश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर, दुकान स्वच्छ करून, सुशोभित करून, सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते. पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात, असे दाते पंचांगकर्तेचे मोहन दाते यांनी सांगितले.
लक्ष्मीपूजनासाठी दुपारी तीन ते रात्री पावणेअकरापर्यंतचा मुहूर्त
दिवाळीतील महत्त्वाचा भाग लक्ष्मी आणि कुबेरपूजन... सायंकाळी घराघरांत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले जाते. यंदा दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजून 15 मिनिट, सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजून 30 मिनिट, रात्री 9 वाजून 10 मिनिट ते 10 वाजून 45 मिनिट... असा लक्ष्मीपूजनासाठीचा मुहूर्त आहे.