Kumar Saptarshi Passes Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन!

गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड
डॉ. कुमार सप्तर्षी
डॉ. कुमार सप्तर्षी
Published on
Updated on

पुणे : समाजवादी आणि गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज असलेले डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत गांधी भवन येथे ठेवले जाईल. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी यांना मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे चिरंजीव डॉ. कबीर हे लंडनमध्ये असून शनिवारी संध्याकाळी ते पुण्यात पोहोचतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

कोण होते कुमार सप्तर्षी?

कुमार सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1939 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड गावात झाला. त्यांचे वडील सरकारी डॉक्टर होते. पाचवीनंतरचे शिक्षण त्यांचे नगर शहरात झाले होते. बीएसएसीनंतर त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले.

1956 ते 1960 या कालावधीत महाराष्ट्र आणि देशातील बदलत्या परिस्थितीतून सप्तर्षी यांच्या राजकीय विचारांची पायाभरणी झाली. महाविद्यालयात डॉक्टरकीचे शिक्षण घेत असताना वर्गप्रतिनिधींच्या निवडणुकांमध्येही ते सहभागी व्हायचे.

निळू फुलेंमुळे 'समाजवादी'

कुमार सप्तर्षी यांनी एका लेखात निळू फुलेंमुळे समाजवादाशी ओळख झाल्याचे सांगितले होते. कुमार सप्तर्षी हे महाविद्यालयात असताना लोकनाट्याच्या दिग्दर्शनासाठी निळू फुलेंना बोलावले होते. यादरम्यान निळू फुलेंनी कुमार सप्तर्षींना समाजवादावरची पुस्तके वाचायला दिली होती. तसेच निळू फुलेंमुळेच समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांची भेट घडली आणि त्यानंतर कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला.

1967 मध्ये युवक क्रांती दलाची स्थापना

तरुणांना संघटित करून सामाजिक- राजकीय परिवर्तन करण्याच्या उद्देशाने 1967 मध्ये कुमार सप्तर्षींनी सिंहगडावर युवक क्रांती दलाची स्थापना केली. डॉक्टर झाल्यानंतर कुमार सप्तर्षी यांनी पुण्यात दवाखाना सुरू केला. पाच वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर म्हणजेच 1969 च्या सुमारास ते पूर्णवेळ युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते म्हणून सक्रीय झाले.

किमान 62 वेळा अटक

सामाजिक क्षेत्रातील अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शैक्षणिक सुधारणा, युवकांचे सक्षमीकरण आणि लोकशाही हक्कांसाठी त्यांनी तीव्र आंदोलने केली. या आंदोलनांसाठी किमान 62 वेळा त्यांना अटक झाली होती.

जनता पक्षात प्रवेश

1977 मध्ये कुमार सप्तर्षी आणि त्यांचे काही सहकारी जयप्रकाश नारायण यांच्या सांगण्यावरुन जनता पक्षात सामील झाले. 1978 मध्ये अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते.

कुमार सप्तर्षींची ग्रंथसंपदा

(१) आम्ही विद्यार्थी आणि आमच्या दंगली

(२) संकल्प

(३) यात्री

( ४ ) स्वप्नांच्या सापळ्यांचा देश : अमेरिका

(५) येरवडा विद्यापीठातील दिवस

(६) सत्तातुराणाम

(७) चंद्रशेखर

(८) धर्माबद्दल

( ९ ) सत्ताबदलाची दोन वर्षे

(१०) मोहनदास गांधी

(११) व्यक्तीरंग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news