

पुणे : कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक परिसरातील बेकायदा बांधकामांविरोधात पुणे महापालिकेने रविवारी (दि. 29) पुन्हा मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण पाच अनधिकृत इमारतींवर हातोडा घालत तब्बल 5 हजार 500 चौरस फुटांचे आरसीसीसी बांधकाम पाडण्यात आले. (Latest Pune News)
कोंढवा येथे महानगरपालिकेची परवानगी न घेत छोट्या-छोट्या जागांवर मोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या सर्व इमारती अनधिकृत असून, खोटी कागदपत्रे दाखवून नागरिकांना येथील सदनिका विकल्या जात आहेत. याबाबतच्या तक्रारी आल्यामुळे महानगरपालिकेने येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
याचाच एक भाग म्हणून रविवारी कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर, गल्ली क्र. 3 मधील 3 मजली इमारत, तर कोंढवा बुद्रुक येथील संत ज्ञानेश्वरनगर, काकडेवस्ती, सर्व्हे नं. 5 मधील तीन 3 मजली इमारतींचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या इमारतींमध्ये मिळून सुमारे 5,500 चौ. फुटांचे आरसीसी बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईसाठी महापालिकेच्या पथकाने 6 बिगारी, 5 पोलिस, 1 जेसीबी, 4 बेकर, 2 गॅसकटर, 5 कनिष्ठ अभियंते आणि 2 उपअभियंते उपस्थित ठेवले होते. संयुक्तरीत्या राबविलेल्या या कारवाईच्या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.