

पुणे : कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी गावचा सुपुत्र सार्थकराज सागर पाटील याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५१ व्या दीक्षांत संचलनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याने राष्ट्रपतींचे रौप्यपदक पटकावून गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. विशेष म्हणजे, या दिमाखदार सोहळ्यात तब्बल १२०० कॅडेट्सच्या संचलनाचे नेतृत्व करण्याचा मानही त्याला मिळाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याला राष्ट्रपतींच्या वतीने रौप्यपदक प्रदान करण्यात आले.
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये रविवारी (दि. २९) १५१ वे दीक्षांत संचलन उत्साहात पार पडले. या सोहळ्यात सार्थकराजने आपल्या खणखणीत आवाजात संचलनाचे नेतृत्व करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याने बारा तुकड्यांचे नेतृत्व केले. त्याच्या शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वाने सोहळ्यात वेगळी छाप पाडली. पदक मिळाल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
सैनिकांच्या गावातून एनडीएपर्यंतचा प्रवास
सैनिक टाकळी हे गाव सैनिकांची परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील जवळपास प्रत्येक घरातील एक व्यक्ती भारतीय सैन्यदलात सेवा बजावत आहे. याच वातावरणात वाढलेल्या सार्थकराजने शालेय जीवनातच एनडीएमध्ये प्रवेश घेऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहिले होते.
सार्थकराजचे वडील सागर पाटील हे शेतकरी असून आई प्रतिभा पाटील गृहिणी आहेत. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या सार्थकराजने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले. दहावीनंतर त्याने थेट डेहराडून येथील सैनिक ॲकॅडमीमध्ये एनडीए प्रवेश परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथील प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळेच एनडीएपर्यंत पोहोचता आल्याचे त्याने सांगितले.
आई-वडिलांचा अभिमान असल्याची भावना
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना सार्थकराज म्हणाला, "ज्या गावातील प्रत्येक घरात एक सैनिक आहे, अशा कोल्हापुरातील सैनिक टाकळी गावातून मी एनडीएमध्ये आलो. माझे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. त्यांचा मला अभिमान आहे."
सार्थकराजचा मोठा भाऊ सक्षम पाटील यानेही शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवले आहे. त्याने नुकतीच बीएएमएसची पदवी पूर्ण केली आहे. एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या भावाची वाटचाल आणि दुसरीकडे देशसेवेच्या दिशेने सार्थकराजने मिळवलेले यश यामुळे पाटील कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सैनिक टाकळी गावातील या सुपुत्राने एनडीएच्या प्रतिष्ठित सोहळ्यात मिळवलेला सन्मान गावाच्या सैनिक परंपरेला नवी झळाळी देणारा ठरला आहे.