

पुणे: दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील एका हिरे व्यापार्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे- सातारा रस्त्यावरील एका सोसायटीच्या परिसरातून व्यापार्याचे सोमवारी (दि. 3) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले.
दरम्यान, अपहरण झालेल्या व्यापार्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. हिरे व्यापार्याचे आर्थिक वादातून अपहरण झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत व्यापार्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अपहरण करणार्या आरोपींविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरे व्यापारी कुटुंबीयांसह पुणे-सातारा रस्त्यावर बिबवेवाडी भागात एका सोसायटीत राहायला आहेत. हिरेजडीत दागिन्यांची विक्री ते करतात. सोमवारी व्यापारी आणि त्यांची पत्नी मुलीला शाळेत आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते.
मोटारीतून ते सोसायटीत आले. त्यानंतर लष्कर भागात कामानिमित्त जाणार असल्याचे सांगून हिरे व्यापारी दुचाकीवरून गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास व्यापार्याच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. ’मैंने आपके पतीको उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससूरजी को बोलो, दो घंटे में फोन करेंगे’ अशी धमकी देण्यात आली.
त्यानंतर व्यापार्याच्या पत्नीने त्वरित या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबवेवाडी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.
रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत.नवले पूल परिसरात दुचाकी सापडली मुलीला शाळेतून बिबवेवाडीतील सोसायटीत सोडल्यानंतर हिरे व्यापार्याचे अपहरण करण्यात आले. सोमवारी सायंकाळी हिरे व्यापारी सिंहगड रस्ता भागातील नवले पूल परिसरात असल्याचे तांत्रिक तपासात आढळून आले. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. नवले पूल परिसरात हिरे व्यापार्याची दुचाकी पोलिसांना सापडली.
अपहरणाचे कारण अस्पष्ट?
प्राथमिक चौकशीत दोन कोटींच्या खंडणीसाठी हिरे व्यापार्याचे अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. त्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने काही जणांकडून पैसे घेतले होते. अपहरणामागचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
व्यापारी सीसीटीव्हीत कैद
अपहरण झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्या वेळी व्यापारी एका ट्रॅव्हल्समधून बंगळुरूकडे जाताना दिसून येत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर व्यापार्याच्या पत्नीला फोनवरून बोलणार्या व्यक्तीची माहिती घेतली जात आहे.