रामदास डोंबे
दौंड तालुक्यातील खोर गाव हे अंजिराचे उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. मात्र अंजीर शेतीबरोबरच अंजीर रोपांची रोपवाटिका तयार करण्यातदेखील खोर गाव अग्रेसर बनले गेले आहे. याच गावातून आज तब्बल 10 राज्यांत या अंजीर रोपांची विक्री होत आहे. दौंड तालुक्याच्या ग्रामीण डोंगराळ, अवर्षणग्रस्त भागातील अंजीर व अंजीर रोपे आज देशभरात पोहचली आहेत.
दौंड तालुक्याच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण हे अत्यल्प प्रमाणात असल्याने आज फळबागेची शेती करण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. याच अंजीर शेतीला येथील युवकवर्गाने पूरक असा कमी पाण्यावरील रोपवाटिका व्यवसाय सुरू करून अंजीर शेतीबरोबरच अंजीर रोपे तयार करण्याचा मार्ग अवलंबिला आहे.
याबाबत माहिती देताना येथील शेतकरी अजित डोंबे म्हणाले की, कोरोना कालावधीत शेती व्यवसायाला पूरक रोपांची लागवड करण्याचा जोडधंदा सुरू केला आहे. आज या रोपवाटिका व्यवसायाला पाच वर्षे झाली आहेत. अंजीर हे फळ आरोग्यदायी, गोड असल्याने या फळाला मोठी मागणी बाजारपेठेत आहे. त्यामुळे या फळाची रोपे तयार करण्याचा मार्ग आम्ही अवलंबिला आहे. आम्ही सुरू केलेल्या या रोपांना आज तब्बल दहा राज्यांतून मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्याबरोबरच केरळ, आंध— प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, छतीसगड या राज्यात ऑनलाइन रोपे व झाडांची बुकिंग होऊन निर्यात केली जात आहे. 450 रुपयांना हे अंजीर रोप विकले जात असून याचबरोबर फळझाडामध्ये आंबा, नारळ, चिकू, मोसंबी, पेरू, आवळा, कडूलिंब, जंगली झाडे, बदाम, काजू, मसाल्याची झाडे, सफरचंद, आवा कडू, बारमही लिंबू, औषधी वनस्पती या झाडांची विक्रीदेखील ऑनलाइन पद्धतीने देशभरात विक्री करण्यात येत आहे. कृष्णाई नर्सरीच्या माध्यमातून ही विक्री केली जात असल्याचे अजित डोंबे यांनी सांगितले आहे.
दोन वर्षांपर्यंत असलेली रोपे ही 450 रुपयांपर्यंत विक्री केली जात आहेत. तर चार वर्षांपर्यंत असलेली झाडे ही 1 हजार 200 रुपयांपर्यंत विक्री केली जात आहेत. सन 2022 मध्ये वर्षाकाठी 40 लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र ग्राहक वर्गाची रोपांना वाढत चाललेली पसंती पाहता व ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्यात येत असल्याने आज हेच उत्पन्न 1 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहे.
अजित डोंबे, शेतकरी, खोर