

पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात सध्या 7.64 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा एक टीएमसीहून अधिक असला तरी उपलब्ध पाणीसाठ्यापैकी पिण्यासाठी आणि शेतीसाठीचा वापर विचारात घेतला तरी हा साठा जून महिन्याची मागणी कशीबशी पुरवू शकते.
मात्र, जुलैमध्ये पाण्याची टंचाई भासू शकते, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे जलसंपदा विभागाने 15 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल, या दृष्टीने नियोजन करण्याचा सल्ला महापालिकेला दिला आहे.
शहराला पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला प्रकल्पात सध्या असलेल्या पाणीसाठ्यापैकी 4.70 टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित पाणी शेतीचे सिंचन आणि ग््राामीण भागातील पिण्यासाठी शिल्लक ठेवण्यात आले आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार हे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. पुणे शहराला दररोज 1550 ते 1600 एमएलडी पाणीपुरवठा गरजेचा असतो. मात्र, उन्हाळ्यात ही मागणी वाढते. यंदा कडक उन्हाळामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही जास्त आहे.
सध्या दरमहा 1.60 टीएमसी इतका
पाणीपुरवठा शहराला केला जातो. शहराची गरज लक्षात घेता मेअखेरपर्यंतचा विचार करता जून आणि जुलै महिन्यासाठी जेमतेम तीन टीएमसी इतका पिण्याच्या पाण्याचा साठा धरणामध्ये शिल्लक राहणार आहे. त्यामध्ये जून महिन्याचा 1.60 टीमएसी साठा वजा केल्यास जुलै महिन्यात एक ते सव्वा टीएमसी इतका पाणीसाठा पिण्यासाठी शिल्लक असेल, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
आतापासून पाणीबचतीचे नियोजन करणे आवश्यक
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा अलनिनो या घटकामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीसाठ्याचा विचार करता महापालिकेने आतापासून पाणी बचतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा जुलैतच पाणीटंचाईला सामोरे जावे लागले, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जलसंपदा विभागाने यापूर्वीच 15 ऑगस्टपर्यंत पाणी पुरावे यासाठी महापालिकेने नियोजन करावे, असे सुचवले होते. त्यानुसार पाणीकपातीचा सल्लाही दिला होता. मात्र, महापालिकेने 31 मेपर्यंत पाणीकपात करणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे.