खडकवासला, ताम्हिणी परिसर होणार जागतिक टुरिस्ट डेस्टिनेशन

पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही येथे पर्यटकांची झुंबड उडालेली असते
tamhini ghat
ताम्हिणी घाट Pudhari
Published on
Updated on

गजानन शुक्ला

पुणे : पानशेत, खडकवासला, लोणावळा, खंडाळा, वरसगाव अन् मुळशी ही पुण्यातील पावसाळी सहलीची प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही येथे पर्यटकांची झुंबड उडालेली असते. या व अशा सर्वच स्थळांची माहिती जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यातून मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणांना आता पूर्वीपेक्षाही अधिक पर्यटक भेटी देऊ शकतील. परिणामी, जिल्ह्यातील पर्यटनाला गती मिळून पर्यटनाचा विकास होणार आहे.

मुळशी धरण : मुळशी धरण परिसर हे पुण्यातील आणखी एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील जलाशय, डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येतो. मुळशी धरणकाठावर कॅम्पिंगचा आनंद घेता येतो. येथे रात्री तंबू टाकून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्काम करण्याचा भन्नाट अनुभव मिळतो. मुळशीजवळील अंदारबन हे गिर्यारोहनासाठी प्रसिद्ध आहे. येथे दाट जंगलातून पायी चालण्याचा थरारक अनुभव मिळतो. या धरणाजवळील पिरंगुट आणि पौड ही गावे पर्यटकांना आकर्षित करतात. येथे रिसॉर्ट्स, फार्महाऊस आणि कॅम्पिंग साइट्स आहेत.

ताम्हिणी घाट : मुळशीपासून जवळच असलेल्या ताम्हिणी घाटात सुंदर धबधबे, दाट जंगल आणि निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. पावसाळ्यात येथील धबधबे आणि धुक्याचा नजारा मंत्रमुग्ध करणारा असतो. हे ठिकाण ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहे.

लोणावळ्यातील वलवण व भुशी धरण : लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथून सह्याद्रीच्या डोंगररांगांचे आणि दर्‍यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. राजमाची किल्ला हा गिर्यारोहकांचे एक आवडते ठिकाण आहे. लोणावळ्यापासून काही अंतरावर असलेल्या या किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगांचा नजारा दिसतो. कार्ला आणि भाजे लेणी जवळच आहे. तसेच पवना लेक येथे पर्यटक कॅम्पिंग, बोटिंग आणि फोटोग्राफीचा आनंद घेतात.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय : पुण्यातील कात्रज भागात हे संग्रहालय आहे. या संग्रहालयाला लागूनच सर्पोद्यान आहे. येथे विविध प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप ठेवण्यात आले आहेत. ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांसाठी महत्त्वाची आहेत.

भोर परिसर : नीर डोंगर आणि धबधबा, पावसाळ्यात नीर डोंगरावरून वाहणारा धबधबा पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण असतो. येथे ट्रेकिंग आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.

ताम्हिणी घाट परिसरातील पर्यटनस्थळे : पावसाळ्यात येथील दाट धुके, धबधबे आणि हिरवेगार जंगल पर्यटकांना आकर्षित करते. घाटातील वळणदार रस्ते आणि निसर्गसौंदर्यामुळे हा भाग लोकप्रिय आहे.

खडकवासला धरण ठरतेय आकर्षण

पुणे शहराच्या जवळ आणि पुणेकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे हे धरण आहे. येथे फिरण्यासाठी आणि जवळपासच्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. संध्याकाळी धरणकाठावरून सूर्यास्त पाहणे हा मनोहारी अनुभव असतो. परिसरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news