Summary
वरसगाव, पानशेत धरणातील विसर्ग बंद; ’टेमघर’मधून ’खडकवासला’त पाणी
खडकवासला धरणसाखळीची एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
बुधवार दिवसअखेर पाणीसाठा 25.97 टीएमसी, 89.08 टक्के
वेल्हे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्याची वाढ मंदावली आहे. बुधवारअखेर (दि. 6) धरणसाखळीत एकूण 89.08 टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला. दुपारी कडक उन्हानंतर रायगड जिल्ह्यातील घाटमाथा, पानशेत व वरसगाव परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. (Pune latest News)
मंगळवार (दि. 5) सायंकाळी 5 वाजता साखळीतील पाणीसाठा 29.95 टीएमसी इतका होता. मात्र गेल्या 24 तासांत केवळ 0.02 टीएमसी इतकीच वाढ झाली आहे. गेल्या 7 दिवसांपासून चारही धरणक्षेत्रांत पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचा अभाव राहिल्याने नद्या, ओढे आणि नाल्यांचे प्रवाह मंदावले आहेत. बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर पावसाचा शिडकावा झाला, त्यामुळे पावसाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सध्या वरसगाव आणि पानशेत धरणांमधून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर टेमघर धरणातून नियंत्रित पद्धतीने पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासला धरणाची पातळी 70 टक्क्यांहून अधिक झाली आहे.