

Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील बहुचर्चित लोहगड हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कसून चौकशी करत असून, तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे दावे समोर आले आहेत. मात्र, हे सर्व दावे सध्या पोलिसांच्या तपासाचा भाग असून त्यावर न्यायालयीन निर्णय होणे अद्याप बाकी आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, 31 मे रोजी सिया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी केतन एका धोकादायक कड्याजवळ बसला असताना त्याला दरीत ढकलून अपघाताचा आभास निर्माण करण्याची कल्पना सियाच्या मनात आली असावी, असा तपास यंत्रणांचा संशय आहे.
तपासात आणखी एक महत्त्वाचा दावा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 14 जून रोजीही केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्या वेळी सियाने "समोर साप आहे" असे सांगत गोंधळ निर्माण केला आणि घटना अपघातासारखी दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर सिया आणि चेतन यांनी एका कॅफेमध्ये भेट घेतल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, या भेटीत दोघांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून नेमक्या कोणत्या ठिकाणाहून दरीत ढकलायचे, याची सविस्तर चर्चा केली होती. घटनास्थळाची पाहणी करून संभाव्य ठिकाणही निश्चित करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
पोलिसांच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर दरीत ढकलण्याचा कट अपयशी ठरला असता आणि केतन बचावला असता, तर त्यानंतर रस्ते अपघात घडवून त्याचा जीव घेण्याचा 'प्लॅन B' देखील तयार करण्यात आला होता. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पोलीस विविध डिजिटल आणि तांत्रिक पुरावे तपासत आहेत.
या प्रकरणामागील हेतू काय होता, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत. प्राथमिक तपासात सिया गोयल लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कुटुंबाच्या इच्छेमुळे तिला केतनशी विवाह करावा लागत होता का, याचाही तपास सुरू आहे.
तसेच, पोलिसांच्या चौकशीत चेतन चौधरीने दिलेल्या माहितीनुसार, सिया साखरपुडा मोडून प्रियकरासोबत पळून जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती तिला वाटत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून डिजिटल पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीची पडताळणी सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आणि न्यायालयात आरोप सिद्ध होईपर्यंत सर्व आरोपींना कायद्याने निर्दोष मानले जाते.