पिरंगुट: गृहमंत्री आणि पालकमंत्री साहेब... आमचे पोलिस ठाणे पौडच ठेवा... आम्हाला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील बावधन ठाणे नकोच... आमची सगळी कामे पौडला असतात आणि एकच काम करण्यासाठी आम्हाला बावधनला जावे लागते... मुळशी तालुक्याचे प्रशासकीय विभाजन करू नका, अशी मागणी पिरंगुट, भूगाव, भुकूम, लवळे, नांदे, चांदे, सूस ग्रामस्थांनी केली आहे.
मुळशी तालुक्याचे प्रमुख ठिकाण हे पौड आहे. त्या ठिकाणी पोलिस ठाणे, तहसीलदार कायार्लय, न्यायालय, भूमी अभिलेख कार्यालय, पंचायत समिती अशी सगळी प्रशासकीय कार्यालये पौडमध्येच आहेत. पौडला गेले की दिवसात किंवा एका हेलपाट्यात सर्व शासकीय कार्यालयांमधील कामे नागरिकांना करता येतात.
आता या पाच-सहा गावांतील नागरिकांना बावधन येथे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जावे लागत आहे. त्या ठिकाणी त्यांच्या शंकेचे निरसन न झाल्यास त्यांना थेट पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात जावे लागते. पिंपरीला जाणे तसे कठीणच आहे. पूर्वी ही गावे पौड पोलिस ठाण्यात होती. पौड ठाण्यात त्यांच्या तक्रारीचे निरसन झाले नाही, तर पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, पाषाण येथे जावे लागे.
त्या ठिकाणी जाण्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. पिंपरीसाठी ती नाही. या परिसरामध्ये नागरिकांना पासपोर्ट आणि पोलिस व्हेरिफिकेशनचे काम पौड येथे सुलभपणे व्हायचे. परंतु, नागरिकांची धांदल उडत आहे. त्यामुळे आम्हाला आमचे पौडच बरे, असे म्हणण्याची वेळ सध्या मुळशीकरांवर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे मत विचारात घेऊन बावधन पोलिस ठाण्यात घेतलेली ही गावे पुन्हा पौड पोलिस ठाण्यात वर्ग करून घेण्यात यावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
या सगळ्या गावांतील ग्रामस्थ ग्रामसभेचे ठराव घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. याबाबतचे निवेदनही मुळशी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिले आहे.