

काटेवाडी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबाबतचे वृत्त समोर येताच त्यांच्या जन्मगावी काटेवाडी (ता. बारामती) येथे दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसून आले.
या अनपेक्षित वार्तेने गावात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वृत्त समजताच गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. अनेक वयोवृद्ध महिला धाय मोकळून रडताना दिसून आल्या. 'आमचा दादा कुठे हाय… आम्हाला सोडून गेलास कसा', अशा हृदयद्रावक शब्दांत गावातील माजी संरपच कल्पना कचरे, वयोवृद्ध महिला पद्मिनी लोंढे व मिराबाई रा. कपसरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शब्दांनी उपस्थितांची मने हेलावून गेली.
गावात शोकमय वातावरण पसरल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दुकाने तातडीने बंद ठेवण्यात आली असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यांवर शांतता असून, प्रत्येक जण मोबाईल व टीव्हीवरील अपडेट्सकडे डोळे लावून बसलेला दिसतो आहे. 'कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यासारखं वाटतंय', अशा शब्दांत अनेक ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला. अजित पवार यांचे काटेवाडीशी असलेले घरातील जिव्हाळ्याचे नाते, त्यांच्या विकासकामांमुळे गावकऱ्यांच्या मनात असलेली आपुलकी यामुळे या घटनेचा धक्का अधिक तीव्रतेने बसल्याचे जाणवत आहे.