पुणे: कोकणच्या हापूस आंब्यापाठोपाठ कर्नाटकातील हापूस आंब्यासह अन्य आंब्यांची बाजारात आवक सुरू झाली आहे. लहरी हवामानामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना उशिराने हा आंबा बाजारात दाखल झाला आहे. कोकणातील हापूसप्रमाणेच कर्नाटक हापूसचे देखील उत्पादन तब्बल
50 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे कोकणातील आंब्यानंतर आता कर्नाटक हापूसचाही तुटवडा मार्केट यार्डातील फळबाजारात जाणवत आहे. घाऊक बाजारात तीन ते चार डझनाच्या कच्च्या आंब्याला 1200 ते 1800 रुपये दर मिळत आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कर्नाटकमध्ये हापूस आंब्याला चांगला मोहोर आला होता. मात्र, हवामान बदलामुळे केवळ 30 टक्केच मोहोरचे रुपांतर फळात झाले आहे. उर्वरित मोहोर गळाला आहे. त्यामुळे मार्च आणि एप्रिल निम्मा आंब्यांची आवक कमी होणार आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळेच सध्या कर्नाटक हापूसची नगण्य आवक होत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी साधारण 700 ते 800 पेटी आवक होत असते. मात्र ती यंदा केवळ 200 पेट्यांच होत आहेत. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार आंब्याचा हंगाम हा 15 एप्रिलनंतरच चांगल्या प्रकारे सुरु होण्यास सुरूवात होईल. 10 ते 15 जुनपर्यंत तो सुरू राहणार असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.
कर्नाटकातील आंब्याचे दर पुढीलप्रमाणे
हापूस (3 ते 4 डझन) 1200 ते 1800 रुपये
पायरी (1 किलो) 120 ते 150 रुपये
लालबाग (1 किलो) 80 ते 100 रुपये
बदाम (1 किलो) 80 ते 100 रुपये
मागील वर्षी पावसाळा लांबला होता. त्याचा फटका उत्पादनावर झाला आहे. नेहमीच्या तुलनेत 50 टक्केच उत्पादन होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याची तुलना केल्यास दरवर्षीच्या तुलनेत केवळ 10 टक्केच माल येत आहे. पुढील आठवड्यापासून आवक वाढण्यास सुरूवात होईल.
- रोहन उरसळ, कर्नाटक हापूसचे व्यापारी