

आशिष देशमुख, पुढारी प्रतिनिधी
पुणे: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या धडकीमुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. त्यामुळे आगामी 20 वर्षे तरी पुन्हा कारगिलसारखे युद्ध करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. जर असे युद्ध पुन्हा झालेच, तर 1999 प्रमाणे आपले नुकसान होणार नाही; शिवाय हे युद्ध आपण दोनच दिवसांत जिंकू...’ हे उद्गार आहेत कारगिल युद्धभूमी जवळून अनुभवलेल्या माजी लष्करी अधिकार्यांचे.
26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळविला. सलग तीन महिने पाकिस्तानकडून या भागात घुसखोरीचा प्रयत्न झाला, तो आपण हाणून पाडला. तब्बल 12 ते 18 हजार फूट उंचीवर असलेल्या कारगिलच्या तळावर तिरंगा फडकला, तो दिवस 26 जुलैचा होता. हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. (Latest Pune News)
यंदा या युद्धास 26 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माजी सैनिकांशी संवाद साधला असता त्यांनी 1999 ते 2025 या सव्वीस वर्षांतील युद्धतंत्रात आमूलाग्र बदल झाल्याचे सांगितले. तसेच, भारत आता राजकीय, आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या खूप पुढे गेल्याने पुन्हा युद्ध झालेच, तर आपण ते दोनच दिवसांत जिंकू. कारण, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची गाळण उडाली आहे, अशा भावना माजी लष्करी अधिकार्यांनी व्यक्त करीत ‘कारगिल ते ऑपरेशन सिंदूर’ या भारताच्या सैन्यदलाच्या प्रगतीची यशोगाथाच सांगितली.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे आपण पाकिस्तानवर केलेले टेस्ट वॉर होते. आपण किती प्रगत झालो आहोत, हेच जगाला दाखवून दिले.
कारगिलमध्ये ज्या चुका राजकीय आणि मिलिटरी पातळीवर झाल्या, त्या आपण ’ऑपरेशन सिंदूर’मध्ये टाळण्यात यशस्वी ठरलो.
कारगिल युध्द संपले; मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही, हा मोठा फरक दोन युध्दांतील आहे.
कारगिल युध्दात 26 वर्षांपूर्वी सेन्सर टू शूटर हे तंत्रज्ञान विकसित नव्हते.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी ते अतिविकसित मॉडेल आपण वापरले. त्यामुळे लाइन ऑफ कंट्रोलशी संबंधच राहिला नाही. खूप लांबून आपण शत्रुराष्ट्रातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करू शकलो.
ड्रोन तंत्रज्ञानासह मदर ऑफ मिसाईल ब्राह्मोस वापरले. त्यामुळे पाकिस्तानची पळता भुई झाली.
3 जुलै 2025 रोजी आपल्याला अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टर मिळाले. त्यामुळे आपली ताकद आणखी वाढली.
आता आपले वायुदल हवेतील 64 टार्गेट एकाच वेळी नेस्तनाबूत करू शकते.
आता सर्व्हेलन्स ड्रोन विकसित झाल्याने सीमारेषेवर अहोरात्र वॉच ठेवणे सहजशक्य झाले आहे.
17 हजार फूट उंचीवर पहाटे 4 ला होतो सूर्योदय
माजी लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारगिल हा परिसर 12 ते 18 हजार फूट उंचीवर आहे. त्यामुळे तेथे पहाटे 4 वाजता सूर्योदय होतो. त्यामुळे तेथे दाट ढग तयार होऊन समोरचे काहीच दिसत नाही.
त्यामुळे या भागात काही ऑपरेशन करायचे झाल्यास रात्री 2 वाजता निघावे लागते. दिवसा सतत बर्फ पडत असतो. त्यामुळे उणे 25 इतके तापमान असते. अशा थंडीत आपण पाकिस्तानची सीमा न ओलांडता पाकिस्तानी घुसखोर सैनिकांविरोधात कारवाई केली. हे युद्ध त्यामुळे जगात दुर्मीळ ठरले. आजवर जगात कोणत्याही देशाच्या सैनिकांना इतक्या उंचीवरील युद्धाचा अनुभव नाही.
कारगिल भागात ड्रोनला मर्यादा...
उणे 25 ते उणे 30 अंश तापमानात फार बारीक ड्रोन उडविणे शक्य होत नाही. या ठिकाणी ड्रोनला खूप मर्यादा आहेत. मोठे ड्रोन काही उंचीपर्यंत नेणे शक्य आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये जसा ड्रोनचा वापर झाला तसा इथे होऊ शकत नाही, असेही लष्करी अधिकार्यांनी सांगितले.
भारताकडे तेव्हा सॅटेलाइट इमेजिंग यंत्रणा नव्हती...
भारतीय लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी तथा सॅटेलाइट इमेजिंगतज्ज्ञ कर्नल विनायक भट म्हणाले की, 1999 मध्ये आपल्याकडे सॅटेलाइट इमेजिंग तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. आपण त्या वेळी जगातील अनेक देशांना ही यंत्रणा मागितली. पण, कोणी दिली नाही. शेवटी रशियाने ते तंत्रज्ञान दिले. पण, ते जुने तंत्रज्ञान दिल्याचे लक्षात आले. आपली फसगत झाली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आपल्याकडे ही स्वतंत्र यंत्रणा विकसित केलेली आहे.
मी या भागात अनेक वर्षे काम केले आहे. सर्व डोंगर मला पाठ आहेत. या ठिकाणी अनेक तळ उभारण्याचे काम केले आहे. हा संपूर्ण भाग आता भिंतीने बंदिस्त केल्याने पाकिस्तानी सैनिकांना आपल्या भागातील दृश्य दिसत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि कारगील युद्धात मोठा फरक आहे. आज 2025 मध्ये राजकीय, आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम झालो आहोत. त्यामुळे कारगिलसारखे युद्ध पुन्हा झालेच, तर आपण दोनच दिवसांत पाकिस्तानला धूळ चारू; पण पाकिस्तान आता अशी हिंमत करणार नाही, इतकी धडकी त्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ने भरवली आहे.
- कर्नल विनायक भट, निवृत्त अधिकारी तथा सॅटेलाइट इमेजिंगतज्ज्ञ, भूज, गुजरात
कारगिलमध्ये तीन महिने युद्धाचे ढग होते. मात्र, प्रत्यक्षात युद्ध 25 दिवस सुरू होते. त्या वेळी हे युद्ध लवकर थांबवा, असा अमेरिकेचा दबाव भारतावर होता. त्यामुळे आपण युद्ध जिंकूनही आपले जास्त नुकसान त्या युद्धात झाले. अमेरिकेने तेव्हा लाइन ऑफ कंट्रोलच्या बाहेर भारताने जाऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, त्या वेळी आजच्यासारखी सशक्त राजकीय, आर्थिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड नव्हती. कारगिल युद्ध आता होणारच नाही; मात्र झालेच तर पाकचा आपण खूप कमी कालावधीत पराभव करू, यात शंका नाही.
- ब्रिगेडिअर श्रीनिवास अंबिके, सेवानिवृत्त लष्करी अधिकारी, पुणे