बारामतीत बैलाच्या वादातून गोळीबार; पीडित गंभीर जखमी

सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांचे गौतम व गौरव हे दोन्ही पुत्र व अन्य तीन अनोळखींचा समावेश
Victim Ranjit Nimbalkar
पीडित रनजीत निंबाळकरFile Photo

बारामती : निंबुत (ता. बारामती) येथे गुरुवारी (दि. २७) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांचे गौतम व गौरव हे दोन्ही पुत्र व अन्य तीन अनोळखींचा समावेश आहे. दरम्यान या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी पाचजणांविरोधात पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नासह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. अंकिता रणजित निंबाळकर (मुळ रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. स्वामी विवेकानंदनगर, फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली.

फिर्यादीत नमूद मजकूर असा, रणजित निंबाळकर यांनी गौतम काकडे यांना सुंदर नावाचा बैल ३७ लाख रुपयांना विकला होता. त्यापैकी ५ लाख रुपये काकडे यांनी निंबाळकर यांना विसारापोटी दिले होते. गुरुवारी उर्वरित रक्कम नेण्यासाठी त्यांना निंबुत येथे बोलावण्यात आले होते. बैल खरेदी केला त्याच दिवशी काकडे यांनी तो खटाव तालुक्यातील बुध येथून निंबुतला आणला. गुरुवारी सकाळी ११ वाजता रणजित निंबाळकर व संतोष तोडकर हे काकडेंकडे आले होते. त्यांच्याशी चर्चा करून ते परत फलटणला गेले. राहिलेले पैसे न देता तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा, असे काकडे म्हणत होते. तर पैसे मिळाल्याशिवाय सही करणार नाही, असे मी सांगून आलो असल्याचे निंबाळकर यांनी आपल्या पत्नीला सांगितले.

नेमके काय घडले?

रात्री नऊच्या सुमारास रणजित निंबाळकर, अंकिता निंबाळकर, त्यांची दहा महिन्याची मुलगी अंकुरण, नातलग वैभव भारत कदम, पिंटू प्रकाश जाधव हे मोटारीतून लोणंद येथे आले. तेथे संतोष तोडकर थांबले होते. तोडकर यांनी निंबाळकर यांना, काकडे हे तुम्हाला सगळे पैसे दिल्याचे सांगत आहेत, मग तुम्ही का सही करत नाही अशी विचारणा केली. त्यावर मला सर्व रक्कम मिळाली नसल्याचे सांगत ते पुढे निंबुतला आले. तेथे काकडे यांच्याशी त्यांची चर्चा सुरु होती. त्यावेळी गौतम काकडे यांनी, तुम्ही संतोष तोडकर यांना ‘मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असे का सागिंतले? तुम्ही असे बोलायला नको होते’ मी तुम्हाला सकाळी पैसे देतो. तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे बोलले.

त्यावेळी निंबाळकर यांनी उरलेले पैसे द्या, लगेच सही करतो. तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर तुमचे पाच लाख रुपये परत करतो, माझा बैल मला द्या अशी मागणी केली. त्यानंतर ते गाडीकडे जात असताना गौतम यांनी तु बैल कसा घेवून जातो तेच मी बघतो, असे म्हणत फोन करून काही युवकांना तेथे बोलावून घेतले. त्यांचा भाऊ गौरव यालाही बोलावण्यात आले. गौरव व अन्य तिघे तेथे आल्यानंतर गौतम काकडे यांनी त्यांना या सराला मारा, लय बोलतोय हा, असे सांगितले.

त्यावेळी गौरवच्या हातातील काठी घेवून गौतम काकडे यांनी ती मारण्यासाठी रणजित यांच्या अंगावर धावून जात शिविगाळ केली. वैभव कदम हे गौतम यांना तुम्ही वाद घालू नका, आपण उद्या व्यवहारावर चर्चा करू, असे म्हणत त्यांना अडवत होते. अनोळखी तिघेजण शिविगाळ करत असताना गौरव याने तु बैल कसा नेतो, तुला जीवंतच ठेवत नाही असे म्हणत त्याच्याकडील पिस्तुलमधून रणजित यांच्या डोक्यात एक गोळी झाडली. गोळी लागताच ते खाली पडले. त्यांना तात्काळ वाघळवाडीत तेथून बारामतीत गिरीराज हाॅस्पिटल आणि तेथून पुण्याला उपचारासाठी हलविण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल घुगे अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news