

Kadve Sarpanch Attack News
वेल्हे : पानशेत धरणतीरावरील कादवे येथे ग्रामपंचायतीच्या विहिरीकडे जाणार्या रस्त्याची सरकारी अधिकार्यांसह पाहणी केल्याच्या कारणावरून भावासह कादवेचे (ता. राजगड) सरपंच अनंता गणपत बिरामणे (वय 45) यांच्यावर पाळीव कुत्र्यासह काठ्या व दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सरपंच अनंता व त्यांचा भाऊ विनोद गणपत बिरामणे (वय 40) हे जखमी झाले आहेत. सरपंच अनंता बिरामणे यांच्या उजव्या पायाचे लचके पाळीव कुत्र्याने तोडल्याने ते रक्तबंबाळ झाले आहेत.(latest Pune News)
ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी साडेबाराच्या सुमारास पानशेत-कादवे रस्त्यावर घडली. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी अर्जुन बापू शिर्के (वय 21) व करण बापू शिर्के (वय 23, दोघे रा. शिर्केवाडी, कादवे) यांना अटक केली. सरपंच अनंता बिरामणे यांच्या अंगावर पाळीव कुत्रे सोडून काठीने मारहाण करणार्या शकुंतला मारुती शिर्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कादवे-शिर्केवाडी येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीकडे जाणार्या रस्त्याची काही लोकांनी जाणून बुजून अडवणूक केली आहे. कादवे ग्रामपंचायतीच्या वतीने विहिरीकडे जाण्यासाठी रस्ता मिळावा, यासाठी राजगड तालुका तहसील व प्रांताधिकारी व इतर सरकारी कार्यालयांमध्ये अर्ज केले आहेत.
त्यानुषंगाने सोमवारी सरकारी अधिकारी अडवणूक केलेल्या रस्त्याची स्थळपाहणी करण्यासाठी आले होते. अधिकारी निघून गेल्यानंतर चिडून जाऊन अर्जुन बापू शिर्के, करण बापू शिर्के व शकुंतला मारुती शिर्के यांनी संगनमताने सरपंच अनंता बिरामणे व कादवेचे पोलिस पाटील भाऊसाहेब भागुजी ढेबे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली.
करण शिर्के व अर्जुन शिर्के याने सरपंच अनंता बिरामणे व त्याचा भाऊ विनोद बिरामणे यांना दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी शकुंतला शिर्के यांनी त्यांच्या घरातील पाळीव कुत्रे सरपंच अनंता बिरामणे यांच्या अंगावर सोडले.