Narayangaon News: विधानसभा निवडणुकीत एकमेकावर केलेली टीका, गंभीर स्वरूपाचे आरोप बाजूला ठेवून नवर्वाचित आमदार शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांची बुधवारी (दि. 4) नारायणगाव येथे येऊन त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमदार सोनवणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार बेनके यांनी सत्कार केला.
तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका या वेळी माजी आमदार बेनके यांनी मांडली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सोनवणे यांनी माजी आमदार बेनके यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. आमदार सोनवणे यांनी केलेल्या आरोपाचे माजी आमदार बेनके यांनी पुराव्यासह खंडन केले होते. तर सोनवणे यांनीही याबाबत बेनके यांनी केलेला खुलासा खोटा असून त्यांच्यावर 200 कोटींचा दावा ठोकणार असे सांगितले होते.
निवडणूक काळात सोशल मीडियावर एक कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आमदार सोनवणे व माजी आमदार बेनके यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. या पार्श्वभूमीवर आमदार शरद सोनवणे त्या वेळी म्हणाले होते की, भविष्यकाळामध्ये मी कधीच अतुल बेनके यांच्यासोबत असणार नाही.
आता मात्र निवडणुकीत केलेले आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी व प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण पुढील काळात एकत्र येऊन काम करू, असे सांगत सोनवणे यांनी बेनके यांची भेट घेतली. तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण हातात हात घालून पुढे जाऊ अशी भूमिका या वेळी सोनवणे यांनी घेतली.
आगामी निवडणुका एकत्रित लढवणार का?
आमदार सोनवणे व माजी आमदार बेनके यांच्या भेटीने तालुक्यात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जुन्नर नगरपरिषद व विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवडणूक हे दोघे एकत्र येऊन तर लढणार नाहीत ना ? याबाबतची देखील चर्चा होऊ लागली आहे. याबाबत आमदार शरद सोनवणे यांना पत्रकारांनी विचारले असता, महायुतीचे नेते काय सांगतील त्यानुसार धोरण अवलंबले जाईल, एवढे सांगून या विषयी अधिक बोलण्याचे टाळले.