Pune: रेल्वे डबे घसरले अन् सर्वांचीच धावाधाव

शेलारवाडीजवळ रेल्वे आणि एनडीआरएफचे संयुक्त मॉक ड्रिल
Pune News
रेल्वे डबे घसरल्याने धावाधावPudhari
Published on
Updated on

Pune News: रेल्वेचे डबे घसरले...अन् एकच धावाधाव झाली... शुक्रवारी सकाळी सुरक्षा यंत्रणांना फोन आले... एनडीआरएफला पाचारण करण्यात आले... खणखण भोंगा वाजवत, अवघ्या काही मिनिटांत एनडीआरएफच्या गाडीने पथकासह पुणे-लोणावळा मार्गावरील शेलारवाडी गाठली. अन् सुरू झाले प्रवाशांना वाचवण्याचे रेस्क्यू ऑपरेशन...!

रेल्वेचा पुणे विभाग आणि एनडीआरएफच्या वतीने शुक्रवारी सकाळी संयुक्त मॉक ड्रिलचे आयोजन केले होते. रेल्वे डब्यांचा अपघात झाला तर काय करता येईल, प्रवाशांना कशाप्रकारे वाचवता येईल, प्राथमिक उपचार तत्काळ कसे पुरवता येतील, याची चाचणी आणि प्रात्यक्षिक शुक्रवारी रेल्वेकडून घेण्यात आले.

पुणे रेल्वे विभागाच्या लोणावळा रेल्वे लाईन 01234 पेरांबूर- प्रयागराज कुंभ एक्स्प्रेस या ट्रेनच्या दोन डब्यांच्या अपघाताची माहिती स्टेशन मास्तरकडून मिळाल्यानंतर, रेल्वे नियंत्रण कार्यालयामार्फत सर्व संबंधित विभागांना तातडीने कळविण्यात आले. कोणताही विलंब न लावता पुणे स्थानकावरून अपघात निवारण गाडी व वैद्यकीय मदत गाडी अपघातस्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आली.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रजेश कुमार सिंग यांच्यासह वैद्यकीय पथक, रेल्वेचे इतर अधिकारी आणि रेल्वे संरक्षण दल लवकरच अपघातस्थळी पोहोचले. मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर पार पडले.

अपघाताची माहिती एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स), एमसीओ आणि स्थानिक प्रशासन, पोलिस, राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाला देण्यात आली. त्यांनी विलंब न लावता आपापल्या टीमसह अडकलेल्या प्रवाशांच्या मदत आणि बचाव कार्यात सहभाग घेतला.

अपघात निवारण कर्मचारी आणि एनडीआरएफने विविध उपकरणांच्या साहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले. मदत आणि बचाव कार्यादरम्यान, एनडीआरएफ कमांडंट एस. बी. सिंग, डेप्युटी कमांडंट प्रवीण धस, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता शादाब जमाल आणि विजयसिंह दडस, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नारायण माहेश्वरी, वरिष्ठ विभागीय अभियंता मनीष सिंह, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी राजेंद्रकुमार कथल, पुणे रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एन. के. संजीव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, सहायक विभागीय सुरक्षा अधिकारी दिलीप तायडे आदी उपस्थित होते.

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी मॉक ड्रीलच्या वेळी सर्व विभागांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक केले. या मॉकड्रीलचे आयोजन सुरक्षा विभाग, पुणे यांनी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news