आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : पिंपळवंडीच्या बाह्मणेमळा येथील घरातून सोन्याचे दागिने चोरून नेणार्या सराईत गुन्हेगारास आळेफाटा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व दुचाकी, असा तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली. संदीप साहेबराव रायते (रा. खडकमाळवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) असे अटक आरोपीचे नाव आहे. बाह्मणेमळा येथे एका घरातील वृद्ध व्यक्तींना तुमच्या नातेवाइकांनी कपाटातील पावती आणावयास सांगितल्याची बतावणी करून कपाटातील साडेचार तोळे वजनाचे मंगळसूत्र, अंगठी व नथ असा सव्वादोन लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज घेऊन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणाने पोबारा केला होता.
याप्रकरणी ओंकार बाह्मणे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सीसीटीव्ही फुटेज व आरोपीचू गुन्हा करण्याची पद्धत याचा अभ्यास केला. अशा प्रकारे गुन्हे करणार्या आरोपीची माहिती गोळा केली. फिर्यादी यांनी आरोपीच्या केलेल्या वर्णनावरून संदीप रायते या सराईत गुन्हेगाराला नाशिक येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकी व सोन्याचे दागिने, असा तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपीवर पन्नासहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन आरगुडे, हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा