भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एनआयटी आणि भारतातील इतर प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मेन्स घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे पुढील वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान 2 सत्रांमध्ये परीक्षा आयोजित केली जाणार आहे. संबंधित परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार असून त्यासाठी नोव्हेंबर महिन्यात नोंदणी सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रवेश परीक्षा तज्ज्ञांनी दिली आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जेईई मेन्स परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर 24, 27, 29, 30, 31 जानेवारी आणि 1 फेब—ुवारी 2024 रोजी घेण्यात आले होते. त्यामुळे ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय गोवा बोर्डाने बारावी परीक्षेच्या नुकत्याच तारखाही बदलल्या आहेत. यापूर्वी बारावीच्या परीक्षा 1 फेब—ुवारी 2025 पासून सुरू होणार होत्या. परंतु, गेल्या वर्षीच्या जेईई मेन्स परीक्षेचा कल लक्षात घेऊन बोर्डाने ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता या परीक्षा 10 फेब—ुवारी 2025 पासून सुरू होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स परीक्षेच्या आयोजनाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अचूक माहितीसाठी, उमेदवारांनी jeemain.nta.ac.in या संकेतस्थळाला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होताच, उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. यासोबतच सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि त्यानंतर शुल्क जमा करावे लागेल. जेईई मेन्स परीक्षा गेल्या वर्षांपासून दोन सत्रांमध्ये घेतली जात आहे. पहिले सत्र जानेवारीमध्ये आणि दुसरे सत्र एप्रिलमध्ये आयोजित केले जाते.
उमेदवारांनी jeemain.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपृष्ठावर लिंक सक्रिय झाल्यानंतर जेईई मेन्स 2025 लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक करा, अशी नवीन विंडो दिसेल. जर तुम्ही नवीन वापरकर्ते असाल तर स्वतःची नोंदणी करा. तुमचा लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा. आता जानेवारी सत्रासाठी जेईई मेन्स ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे जा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.